Join us

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंना उपनगरात शोधून दाखवा, कोरोना लसीकरण फुकट मिळवा; भातखळकरांची अनोखी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 3:29 PM

Find Aditya Thackeray in Mumbai suburbs get corona vaccination for free scheme by BJP MLA Atul Bhatkhalkar :आदित्य ठाकरेंवर टीका करताना भातखळकर यांनी एक अनोखी योजनाच भाजपकडून सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. 

तौत्के चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबईचं देखील नुकसान झालं. मुंबईच्या समुद्र किनारी राहणाऱ्या मच्छिमारांचं नुकसान झालं असतानाही मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे मुंबई उपनगरात फिरकलेले नाहीत. याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंवर टीका करताना भातखळकर यांनी एक अनोखी योजनाच भाजपकडून सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. Find Aditya Thackeray in Mumbai suburbs get corona vaccination for free scheme by BJP MLA Atul Bhatkhalkar :

"मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना उपनगरात शोधून दाखवा आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण मिळवा अशी योजनाच भाजपच्यावतीनं मी सुरू करणार आहे", असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. भातखळकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला असून तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर झालेल्या नुकसानीचा साधा आढावा देखील आदित्य ठाकरे यांनी घेतला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

"आदित्य ठाकरे यांची मुंबई उपनगराच्या पालकमंत्री नेमणूक होऊन आज दीड वर्षे उलटून गेली. या  काळात केवळ एक वेळा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर कोणतीही कार्यवाही पालकमंत्र्यांकडून करण्यात आलेली नाही. मागील वर्षी में महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ आणि परवा आलेले तौक्ते चक्रीवादळ यामुळे वर्सोवा, मढ, मालवणी, गोराई या परिसरातील मच्छीमारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले, मालाड मध्ये झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, चाळीमध्ये, झोपडपट्टीमध्ये, इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या घरगुती साहित्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले, झाडे पडल्यामुळे 48 तासांपेक्षा अधिक काळ अनेक ठिकाणी रस्ते बंद होते.  मी स्वतः व भारतीय जनता पार्टीने वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपनगरांतील लोकांना करण्यात आली नाही. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे लोकांना वाऱ्यावर सोडून, घरात बसून एसीची हवा खाण्यात मग्न आहेत", असा आरोप भातखळकर यांनी केला आहे. 

लपूनछपून ताडोबा पर्यटन करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबईतील नागरिक अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी तडपडून, होरपळून मृत्युमुखी पडत असताना मागील वर्षभराच्या काळात एकाही कोविड केअर सेंटर व रुग्णालयांना भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबई उपनगराच्या नागरिकांसाठी काय काम केले? याचे जनतेला उत्तर द्यावे, असा खडा सवाल सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी  विचारला आहे. 

टॅग्स :अतुल भातखळकरभाजपाआदित्य ठाकरे