हरवलेले आरे दूध केंद्र शोधून द्या
By admin | Published: May 15, 2017 12:53 AM2017-05-15T00:53:06+5:302017-05-15T00:53:06+5:30
लॉटरी पद्धतीने आरे केंद्राची यादी जाहीर झाल्यानंतर, अनामत रक्कम आणि भुईभाडे भरूनसुद्धा अनेक केंद्रचालकांना केंद्राचा ताबा देण्यात आलेला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉटरी पद्धतीने आरे केंद्राची यादी जाहीर झाल्यानंतर, अनामत रक्कम आणि भुईभाडे भरूनसुद्धा अनेक केंद्रचालकांना केंद्राचा ताबा देण्यात आलेला नाही. केंद्रचालकांची बँकेत जामीन म्हणून ठेवलेली अनामत रक्कमसुद्धा आता कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना आरेकडून परत करण्यात आली आहे. केंद्राचा ताबा त्यांना आजपर्यंत मिळालेला नाही. केंद्रचालकांकडे केंद्राचा ताबा नसतानासुद्धा त्याला भुईभाडे भरण्यासाठी नोटीस
पाठविण्यात आलेली आहे. परिणामी, या प्रकरणात लक्ष घालण्यात यावे, यासाठी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आरे केंद्रचालकांसोबत दुग्धविकासमंत्री महादेव जानकार यांची भेट घेतली.
आरे केंद्राचे वाटप झालेले नसतानासुद्धा केंद्रसंचालक हे केंद्रचालक यांना भुईभाडे, इतर कारणांसाठी नोटीस पाठवत आहेत, म्हणून मनसेने या वेळी ‘आरे केंद्र हरवले आहे...मला शोधून द्या’ असा सवाल महादेव जानकर यांना केला. या वेळी शालिनी ठाकरे यांनी आरे केंद्रचालकांना केंद्र चालविताना येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला. ‘आरे शक्ती’ नावाचा नवीन ब्रँड सुरू करण्यात आला असून, त्याचा दर्जा सुमार असल्याची तक्रार केंद्रचालकांनी केल्यानंतरसुद्धा, त्याचा दर्जा का सुधारण्यात आलेला नाही? दर्जा सुधारलेला नसतानाही आरे शक्ती दूध विकण्याची केंद्रचालकांना जबरदस्ती का करण्यात येत आहे? आरेचे दूध विकत असलेल्या केंद्रचालकांच्या नावावर अजूनही स्टॉल का करण्यात आलेले नाहीत? महानगर पालिका केंद्रावर कारवाई करत असताना, आरे का गप्प बसली आहे? आरे व्यक्तिरिक्त इतर खाद्यपदार्थ विकण्यास तोंडी परवानगी आयुक्तांनी दिल्यानंतरसुद्धा केंद्रसंचालक कारवाई का करत आहेत? आयुक्त लेखी आदेश का काढत नाहीत? असे अनेक प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आलेत. दरम्यान, मनसेच्या शिष्टमंडळामध्ये रंजना नाटेकर, राहुल चव्हाण, सलील शेख, सुनेत्रा जाधव आणि दिलीप करबोले आदी केंद्रचालकांचा समावेश होता.