आपत्तीवर मात करण्यासाठी नवीन मार्ग शोधा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:54 AM2019-01-30T00:54:08+5:302019-01-30T00:54:17+5:30
कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातील सर्वच घटकांच्या सहभागामुळे आपत्तीवर मात करण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुंबई : राज्यात कमी पाऊस होऊनदेखील शेतीच्या उत्पादकतेत घट होण्याऐवजी भरघोस वाढच झाली. जलयुक्त शिवार योजनेमुळेच दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करणे शक्य झाले. त्याप्रमाणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातील सर्वच घटकांच्या सहभागामुळे आपत्तीवर मात करण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पवई, आयआयटी संस्थेच्या दीक्षान्त सभागृहात चौथ्या आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या परिषदेत मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेदेखील उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपत्ती निवारण क्षेत्रात गेल्या ३० वर्षांत आमूलाग्र बदल झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपत्ती निवारण हा महत्त्वाचा घटक ठरविला आहे. त्यानुसार, २०३० पर्यंत आपत्तीचे प्रमाण कमी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपत्ती निवारण करणे शक्य झाले आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती निवारणाकरिता नवीन उपाय शोधावेत, तसेच संपूर्ण देशात उत्सर्जन पातळी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प सन २०३० पर्यंत यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू या. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून त्यावर नवनवीन मार्ग शोधले जातील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.
पाचवी परिषद दिल्लीत
आपत्ती व्यवस्थापनावरील सुमारे ४५० संशोधनात्मक पेपरचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले.
तसेच २०२० मध्ये होणारी पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे होणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.