शोधा अन् शिका! शोधगंगावर पाच लाख पीएच.डी. प्रबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:46 AM2023-12-18T09:46:42+5:302023-12-18T09:47:03+5:30

महाराष्ट्रातून पुणे आणि कोल्हापूर विद्यापीठ आघाडीवर

Find out and learn! Five lakh Ph.D. thesis | शोधा अन् शिका! शोधगंगावर पाच लाख पीएच.डी. प्रबंध

शोधा अन् शिका! शोधगंगावर पाच लाख पीएच.डी. प्रबंध

- रेश्मा शिवडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांच्या ग्रंथालयात धूळखात पडून असलेला एम.फील व पीएच.डी.चा प्रबंधरूपी (थिसिस) संशोधनाचा ठेवा जगभरातील संशोधकांना अभ्यासासाठी उपलब्ध व्हावा यासाठी सुरू केलेल्या ‘शोधगंगा’ या संकेतस्थळावर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक प्रबंध उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात पुणे विद्यापीठातून सर्वाधिक म्हणजे १२ हजार ४०४ प्रबंध उपलब्ध झाले आहेत. कोल्हापूर विद्यापीठही सर्वाधिक प्रबंध उपलब्ध करून देणाऱ्या पहिल्या १० विद्यापीठांच्या यादीत आहे. मुंबई विद्यापीठाने १९३० पासूनचे सात हजारांच्या आसपास प्रबंध उपलब्ध करून दिले आहेत. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकाराने ‘शोधगंगा’ उपक्रम देशभरातील जवळपास ७५० विद्यापीठांच्या मदतीने राबविण्यात येत आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबत सूचना दिल्यानंतरही विद्यापीठांनी प्रबंध उपलब्ध करून देण्याबाबत फारशी उत्सुकता दाखविली नव्हती. देशातील सर्वाधिक तीन जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी, तर अवघे ५०० प्रबंध ऑनलाईन उपलब्ध करून दिले होते. परंतु, ‘आता या कामाने चांगलाच जोर पकडला आहे. विद्यापीठाने सुमारे सात हजारांच्या आसपास प्रबंध अपलोड केले आहेत,’ अशी माहिती विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार यांनी ‘लोकमत’ला दिली. आणखी अजून तितक्याच संख्येने प्रबंध असून, हे काम फेब्रुवारीपर्यंत संपविण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.

‘शोधगंगा’विषयी
 एखाद्या विषयावर आतापर्यंत कुणी, कुठे, किती संशोधन केले याची माहिती अनेकदा विद्यापीठांच्या ग्रंथालयातच पडून असते. 
 वर्षानुवर्षे खपून लिहिलेले हे 
प्रबंध खरेतर ज्ञानाचा व माहितीचा मोठा दस्तावेज असतो.
 हे एम.फील, पीएच.डी.चे प्रबंध जगभरातील संशोधकांना उपलब्ध व्हावे, या विचारातून ‘शोधगंगा’चा उगम झाला.
 यूजीसीने नियम करून सर्व विद्यापीठांना या प्रबंधांची इलेक्ट्रॉनिक प्रत देणे बंधनकारक केले आहे. 

काम जिकिरीचे
 प्रथम प्रबंधांच्या प्रत्येक पानाचे स्कॅनिंग केले जाते.
 त्यानंतर त्याची छायाप्रत वाचनयोग्य आणि सुस्पष्ट दिसावी यासाठी तिचे ओसीआरमध्ये (ऑप्टिकल कॅरॅक्टर रिडर) रूपांतर करावे लागते. त्यानंतर ती अपलोड केली जाते. 
 अनेक जुन्या प्रबंधांचे स्कॅनिंग करणे हे काम जिकिरीचे ठरते आहे. 

Web Title: Find out and learn! Five lakh Ph.D. thesis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.