रुग्णालय, कारखान्यांतील रसायनमिश्रित सांडपाण्याचा ‘मिठी’ला विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 02:27 AM2017-10-24T02:27:47+5:302017-10-24T02:27:52+5:30

मुंंबई : अनेक लहान-मोठे नाले मिठी नदीस मिळतात. नाल्यांमध्ये कारखान्यांमधील, रुग्णालयांमधील, झोपडपट्ट्यांमधील दूषित सांडपाणी मिसळते, हेच पाणी पुढे मिठी नदीत मिसळल्यामुळे मिठी नदी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे.

Find out the 'hug' of chemically mixed sewage in the hospitals, factories | रुग्णालय, कारखान्यांतील रसायनमिश्रित सांडपाण्याचा ‘मिठी’ला विळखा

रुग्णालय, कारखान्यांतील रसायनमिश्रित सांडपाण्याचा ‘मिठी’ला विळखा

Next

अक्षय चोरगे 
मुंंबई : अनेक लहान-मोठे नाले मिठी नदीस मिळतात. नाल्यांमध्ये कारखान्यांमधील, रुग्णालयांमधील, झोपडपट्ट्यांमधील दूषित सांडपाणी मिसळते, हेच पाणी पुढे मिठी नदीत मिसळल्यामुळे मिठी नदी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. मिठी नदीच्या प्रदूषणामुळे मुंबईतील जैवविविधतेचा झपाट्याने -हास होऊ लागला आहे. त्यामुळे मिठी नदीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. परिणामी मिठी नदीच्या संवर्धनासाठी मिठी नदीला मिळणाºया नाल्यांवर अथवा ज्या ठिकाणी नाले नदीला मिळतात तेथे सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
के-पूर्व वॉर्डमधील कृष्णानगर नाला, ओबेरॉय नाला, लेलेवाडी नाला, एल वॉर्डमधील जरीमरी नाला, एच पूर्व वॉर्डमधील वाकोला नाला आणि अशा अनेक मोठ्या नाल्यांसह लहान नाले मिठी नदीला येऊन मिळतात. हे नाले ज्या भागांमधून मिठी नदीस मिळतात, या नाल्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्ट्यांमधील रहिवासी नाल्यांमध्ये कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकतात. नाल्यांच्या आसपासच्या परिसरात कारखाने, विविध कंपन्या आहेत. यामधील सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडले जाते. या पाण्यामुळे मिठी नदी प्रदूषित होत आहे, असे या क्षेत्राचे अभ्यासक गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई महापालिका आणि केंद्रीय पर्यावरण विभाग मंत्रालयाकडे या प्रकरणी सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मिठी नदीला मिळणाºया नाल्यांवर रेडी मिक्स काँक्रिट प्लान्ट, मार्बल कटिंग इंडस्ट्रीज, विविध हॉटेल्स, लाँड्री इंडस्ट्री, डाय आणि केमिकल इंडस्ट्री, पावडर कटिंग इंडस्ट्री आणि वाहनांचे सर्व्हिस सेंटर असल्यामुळे या कंपन्यांमधील सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडले जाते. या पाण्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. नदीतील पाण्याचा दर्जा खालावलेला आहे. मिठी नदीवर एक हजार कोटी रुपये खर्च करूनही नदीची अवस्था जैसे थेच आहे, अशी टीका पर्यावरणतज्ज्ञांनी केली आहे. वरळी आणि मालाडमध्ये नाल्यांवर पुनर्प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारे अजून काही केंद्रे उभी केली तर त्याचा फायदा येत्या काळात दिसेल, असा आशावादही पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
>जलचर नष्ट
पुनर्प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जाते. तेच पाणी नदीतून समुद्रात सोडल्यामुळे समुद्र प्रदूषित होत आहे. समुद्रातील जीव त्यामुळे नष्ट होऊ लागले आहेत. समुद्रात मासे सापडणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मच्छीमारांना मासे पकडण्यासाठी खोल समुद्रात जावे लागत आहे. समुद्रातील जीव वाचवण्यासाठी मिठी नदीत आणि समुद्रात सोडल्या जाणाºया पाण्यावर पुनर्प्रक्रिया होणे आवश्यक आहे.
बहुतांश नाले हे झोपडट्ट्यांमधून येऊन नदीला मिळतात. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा फेकला जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीखालून नाले तयार करावे. प्रक्रिया न केलेले पाणी नाल्यांमध्ये जाते. त्यामुळे नदी-नाले प्रदूषित होत आहेत. नाल्यांमधील सांडपाणी अथवा नदीमधील पाणी पुनर्प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी असा प्लान्ट उभारणे शक्य नाही.
त्यापेक्षा नाले एका ठिकाणी जोडून तेथे असा प्लान्ट तयार करणे शक्य होईल. त्यासंबंधीचे नियोजन सध्या महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू आहे. परंतु त्यास अजून किती वेळ लागेल सांगता येत नाही, अशी माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली.
>धारावी भागामध्ये कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. साहित्य तयार करण्यासाठी रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या भागामध्ये वाहनांचे सर्व्हिस सेंटर, वर्कशॉपची संख्या हजारांमध्ये आहे. येथील रसायनमिश्रित सांडपाणी थेट नाल्यांमध्ये मिळते. त्यामुळे धारावीमध्ये सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राऐवजी रसायन पुनर्प्रक्रिया केंद्र उभारणे अत्यावश्यक आहे.
- परवीश पांड्या, पर्यावरणतज्ज्ञ

>सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र सर्वच ठिकाणी उभारणे शक्य नाही. त्यामुळे मोठमोठे कारखाने, कंपन्या, सर्व्हिस सेंटरमध्ये स्वतंत्र सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र असावे. असे पुनर्प्रक्रिया केंद्र नसलेल्या कंपन्यांना परवाने दिले जाऊ नये. ज्यामुळे सांडपाणी थेट नदी-नाल्यात जाणार नाही आणि पाण्याचाही पुनर्वापर करणे शक्य होईल. पाण्याची बचत होण्यास मदत होईल. नदीवर अथवा नदी जेथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी शासनाने सांडपाणी पुनर्प्रक्रिया क्रेंद्र उभारावे.
- राजकुमार शर्मा, पर्यावरणतज्ज्ञ

Web Title: Find out the 'hug' of chemically mixed sewage in the hospitals, factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.