रेल्वे स्थानकाला गर्दुल्ल्यांचा विळखा
By admin | Published: May 31, 2017 06:41 AM2017-05-31T06:41:41+5:302017-05-31T06:41:41+5:30
कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. रेल्वे स्थानकावर भिकारी आणि भटक्या कुत्र्यांची संख्यासुद्धा मोठ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. रेल्वे स्थानकावर भिकारी आणि भटक्या कुत्र्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुर्ला स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १शेजारी असलेल्या तिकीटघरासमोर कुत्रे आणि भिकाऱ्यांचा मुक्त वावर असतो. त्यामुळे तिकीटघरासह प्लॅटफॉर्म अस्वच्छ झाला आहे. स्थानक परिसरातील गर्दुल्ले, भिकारी आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील कुर्ला हे महत्त्वाचे स्थानक आहे. स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या स्थानकावरील गर्दुल्ले, भिकारी आणि भटक्या कुत्र्यांच्या वावराचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. गर्दुल्ले कुर्ला स्थानकाच्या पादचारी पुलांवर, पुलाच्या पायऱ्यांवर उघड आणि सर्रासपणे नशा करतात. नशेच्या अवस्थेत स्थानक परिसरात कुठेही झोपतात. त्यात भर म्हणून की काय पादचारी पुलांवर फेरीवाल्यांचेही अतिक्रमण आहे. परिणामी, प्रवाशांना चालण्यासाठी अत्यंत चिंचोळा मार्ग शिल्लक राहतो.
या ठिकाणी असणारे भिकारी व गर्दुल्ले तिकीटघरासमोर कचरा करतात. तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांकडे पैशांची मागणीही करतात. भिकारी व गर्दुल्ले येथे बसून जेवण करतात. उरलेले अन्न आणि कचरा तेथेच टाकतात. भिकाऱ्यांची मुले नैसर्गिक विधी उरकतात. त्यामुळे स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य झाले आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत.
प्लॅटफॉर्म क्रमांक १जवळील तिकीटघरासमोर भिकारी आणि कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. तिकिटाच्या रांगांमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांना बऱ्याचदा भिकारी आणि कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
गर्दुल्ल्यांची
भीती वाटते
आपल्याकडे अधिक सामान असेल तर तिकीटघरासमोर उभे राहायला भीती वाटते. कारण गर्दुल्ले सामानाच्या आसपास भटकत असतात. तिकिटाच्या रांगेत उभे असताना सामानावर बारीक नजर ठेवावी लागते.
- शोभा भापकर, प्रवासी
तिकीटघर
बनले घाणेरडे
गर्दुल्ल्यांमुळे तिकीटघर घाणेरडे झाले आहे. सर्वत्र कचरा साचलेला असतो. प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने यांची संख्या वाढली आहे.
- प्रकाश पवार, प्रवासी
जबरदस्तीने पैशांची मागणी
भिकारी प्रवाशांकडे पैशांची मागणी करतात. कित्येकदा जबरदस्तीने मागतात. प्लॅटफॉर्मपर्यंत मागे मागे चालत येतात. यांना रेल्वेने चाप बसवला पाहिजे.
- विनोद कदम,
प्रवासी
चोरीचे प्रमाण वाढले
स्थानक परिसरात भिकारी, गर्दुल्ले आणि कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यांच्यामुळे रेल्वे स्थानकात चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ज्या चोऱ्या स्थानक परिसरात होतात, त्यांत स्थानक परिसरात नेहमी वावरणाऱ्या गर्दुल्ल्यांचाच सहभाग असण्याची शक्यता आहे.
- सागर मोरे, प्रवासी
कारवाईचे आदेश
संबंधित अधिकाऱ्यांना रेल्वे स्थानक परिसरातील गर्दुल्ले, भिकारी आणि आणि भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत.
- रितेश अहेर,
जनसंपर्क अधिकारी, जीआरपी