‘या कृत्यामागे कोण आहे ते शोधून कारवाई करा’, मुख्यमंत्री ठाकरेंचे सक्त आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 05:51 AM2022-04-09T05:51:44+5:302022-04-09T05:52:04+5:30
ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या घरावर अचानक झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुंबई :
ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या घरावर अचानक झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. शासनाने काय, काय निर्णय घेतले आहेत, त्याची व्यवस्थित माहिती उच्च न्यायालयाला दिली आहे. मात्र, नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर हल्ले करणे, हा पायंडा महाराष्ट्राने पाडलेला नाही.
एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे, या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील, ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयानेसुद्धा त्याची नोंद घेत एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले.
कर्मचाऱ्यांनीही याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत असतानाच अचानक दुपारी पवार यांच्या निवासस्थानी जमाव पोहोचून घोषणाबाजी करतो व दगडफेक, चप्पलफेक करतो, ही कृती अतिशय अनुचित व न पटणारी आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई करण्याच्या सूचना मी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत.
‘काहींचा अस्वस्थता पसरविण्याचा प्रयत्न’
शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यामागे राजकीय पक्ष, अज्ञात शक्तींचा हात असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सांगितले. मी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मुंबईतील ‘क्राइम कॉन्फरन्स’मध्ये होतो. पवार यांच्या निवासस्थानी हल्ला होणार असल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली नव्हती का, काही उणिवा राहिल्या का, याचीही चौकशी केली जाईल.
सर्वथा चुकीची घटना
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरावर असे आंदोलन करणे हे अजिबात समर्थनीय नाही. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्य प्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षाही मी व्यक्त करतो.
- देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते
हा लोकशाहीचा खून
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पेढे वाटले. न्यायव्यवस्थेचा जयजयकार केला. मात्र शुक्रवारी अचानक ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा खून आहे.
- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
...तर कडक कारवाई
महाराष्ट्राचे राजकारण कधीही इतके घाणेरडे झाले नव्हते. असे कुणाच्या घरावर आंदोलन झाले नव्हते. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि कडक कारवाई केली जाईल.
- आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री
दगडफेकीचे कारण काय?
आजच्या घटनेचे कर्तेकरविते कोण याची चौकशी तातडीने झाली पाहिजे. काल उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशाप्रकारे पवार यांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय?
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कायदा हातात घेऊ नका
आजच्या प्रकारामागे असलेल्या भावना भडकविणाऱ्या लोकांना कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये. कामावर रुजू व्हावे. कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या सहकाऱ्यातून एसटीला पूर्वीचे चांगले दिवस येऊ शकतात. कायदा हातात घेऊन कोणाचाही फायदा होणार नाही.
- अनिल परब, परिवहनमंत्री