सीआरएम प्रणालीचे निष्कर्ष सांगणार कोरोना संसर्गाची तीव्रता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:19+5:302021-09-21T04:06:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : साधारणतः एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही, हे समजण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साधारणतः एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही, हे समजण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी केली जाते. मात्र, रुग्णाला झालेल्या संसर्गाची तीव्रता किती आहे, हे समजण्यासाठी आतापर्यंत प्रभावी यंत्रणा नव्हती. मात्र, भविष्यात ते समजण्यासही मदत होणार आहे. आयआयटी मुंबई आणि कस्तुरबा रुग्णालयातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. संशोधनाच्या या चाचणीतून रुग्णाच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रोटिन किती प्रमाणात आढळते त्यावरून आजाराची तीव्रता लक्षात येऊ शकते, असा निष्कर्ष काढला आहे.
सद्य:स्थितीत कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे पाहण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. मात्र, रुग्णाला कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आहे, हे मोजण्याचे सक्षम प्रमाण उपलब्ध नव्हते. यामुळे आयआयटी मुंबई आणि कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी एक संशोधन केले आणि त्यांचे हे संशोधन ‘आय सायन्स’ या विज्ञान नियतकालिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी कौन्सिल फॉर सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रीअल रिसर्चने (सीएसआयआर) आणि आयआयटी मुंबईने निधी उपलब्ध करून दिला आहे.
कोणत्याही आजारावर सुरुवातीच्या काळात औषध निर्मिती करण्याची प्रक्रिया खूप अवघड आणि वेळखाऊ असते. यामुळे यासाठी जास्तीत जास्त अभ्यास होणे आवश्यक आहे, असे आयआयटी मुंबईच्या जैव विज्ञान आणि जैव इंजिनिअरिंग विभागाच्या प्रा. कृती सुवर्ण यांनी सांगितले. हे संशोधन करण्यासाठी संसर्गित रुग्ण आणि कोरोना न झालेले रुग्ण अशा रुग्णांच्या शरीरातील प्रथिनांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये काेरोना झालेल्या रुग्णाच्या शरीरात विशिष्ट २५ प्रकारच्या प्रथिनांच्या किमान संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. यासाठी संशोधकांनी ‘सीलेक्टेड रिॲक्सन मॉनिटरिंग’ (एसआरएम) प्रणालीचा वापर केला. ही पद्धत केवळ प्रथिनांचाच अभ्यास करण्यासाठी वापरली जाते. या चाचणीसाठी रुग्णांच्या घशातून घेतलेल्या स्वॅबचा वापर करून ही चाचणी करण्यावर संशोधन करण्यात यश आले आहे.
उपचार करणे होणार सुलभ
आरटीपीसीआरमुळे खूप चांगले निष्कर्ष समोर येत आहेत. मात्र, उपचारादरम्यान रुग्णाच्या शरीरात वारंवार बदल होत असतात, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी या संशोधनाचा लाभ होणार आहे. त्यामुळे उपचार करणेही अधिक सुलभ होणार आहे, असे मत संशोधन पथकाचे प्रमुख डॉ. संजीव श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.