मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांना पूर्व मुक्त मार्गावरून दुचाकी चालविणे महागात पडले आहे. राज्य सहकारी बँक चौकशी प्रकरणी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईडी कार्यालयात जाणार होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी कांबळे पूर्व मुक्त मार्गावरुन दुचाकीने जात होते. याप्रकरणी वडाळा वाहतूक पोलिसांनी दुचाकीचे मालक गायकवाड यांना २०० रुपयांचे इचलन आकारले आहे.पूर्व मुक्त मार्गावरुन कांबळे दुचाकी चालवीत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. कांबळे आपल्या समर्थकांसह पूर्व मुक्त मार्गवरुन दुचाकी चालवीत असल्याचे समोर आले. याप्रकरणी दुचाकी मालकास आम्ही इचलन पाठविले आहे. तसेच त्या दुचाकीची माहिती आम्ही गोळा करत आहोत असे वडाळा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रत्नाकर सावंत यांनी सांगितले. तर कांबळे म्हणाले की , ईडी कार्यालयात तात्काळ पोहोचण्यासाठी मी आणि कार्यकर्ते पूर्व मुक्त मार्गावरून गेलो. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकणी आम्ही दंड भरला आहे.
पूर्व मुक्त मार्गावरून दुचाकी चालविणे माजी आमदाराला पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:13 AM