लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, थुंकणे, रस्त्यावर कचरा फेकणे, अस्वच्छता करणाऱ्यांवर क्लीन अप मार्शलनी एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान एक लाख २५ हजार जणांवर कारवाई करून तीन कोटी ५६ लाख ६२ हजार इतका दंड वसूल केला आहे.
२४ वॉर्डामध्ये क्लीन अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. ते अस्वच्छता करणाऱ्यांवर २ एप्रिल २०२४ पासून कारवाई करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून कमीत कमी १०० रुपये, तर जास्तीत जास्त हजार रुपये दंड आकारण्याचे अधिकार क्लीन-अप मार्शलना आहेत. ऑनलाइन पद्धतीने हा दंड वसूल करण्यात येत आहे.
सात महिन्यांत अस्वच्छतेच्या ६४ हजार तक्रारी
कुलाबा, नरिमन पॉइंट, चर्चगेट येथील उच्चभ्रू वस्ती आणि शासकीय व व्यावसायिक कार्यालये असणाऱ्या 'ए' वॉर्डातून मागील सात महिन्यांत अस्वच्छतेच्या ६४ हजार तक्रारींची नोंद झाली. उपद्रव शोधपथक आणि क्लीन अप मार्शलनी संबंधितांकडून ४७ लाख ३ रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर सायन, माटुंगा, किंग्ज सर्कल या एफ उत्तर भागात पाच हजार ६२४ जणांवर आणि एल्फिन्स्टन, प्रभादेवी, आदी भाग असलेल्या जी उत्तर भागात चार हजार ६५१ जणांवर कारवाई झाली आहे.
दंडाची अर्धी रक्कम पालिकेला मिळणार
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून वसूल केलेल्या दंडाची अर्धी रक्कम संबंधित कंत्राटदाराला, तर अर्धी रक्कम पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे पालिकेच्या महसुलात भर पडणार आहे.