दंड तर भराच, पण कृपया माेफत दिलेला मास्क लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:07 AM2020-12-02T04:07:14+5:302020-12-02T04:07:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केल्यानंतर ते तसेच विनामास्क पुढे जातात. त्यामुळे संबंधित नागरिकास आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केल्यानंतर ते तसेच विनामास्क पुढे जातात. त्यामुळे संबंधित नागरिकास आता दंड भरल्यानंतर लगेचच एक मास्क मोफत दिला जाईल. याची नोंद दंडाच्या पावतीवर केली जाईल. निदान हा मास्क लावायला विसरू नका, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी १४ ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन विनामास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दंड म्हणून २०० रुपये भरावे लागतात. प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके असून, या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना आहेत. क्लीनअप मार्शलही नियुक्त करण्यात आले आहेत.
विनामास्क आढळलेल्या ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून आतापर्यंत सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.