कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचे जेल भरो
By admin | Published: January 13, 2017 04:31 AM2017-01-13T04:31:51+5:302017-01-13T04:31:51+5:30
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या सरकारने मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत,
मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या सरकारने मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत, मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने गुरुवारी आझाद मैदान येथे जेल भरो आंदोलन केले. या वेळी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भेट दिली. शिवाय शिक्षणाच्या मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
येत्या १५ दिवसांत मागण्यांवर अंमलबजावणी होताना दिसली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी दिला आहे. देशमुख यांनी सांगितले की, आश्वासने देणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शिक्षकांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारविरोधात जेल भरो केल्याचे देशमुख यांनी सांगितले. शिक्षणमंत्र्यांंनी अंमलबजावणीचे आदेश दिले असले, तरी येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी होताना दिसली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. गेल्या वर्षी शिक्षकांनी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. परिणामी, जेल भरो आंदोलनानंतरही सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही, तर बारावीच्या परीक्षेवेळी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)