मुंबई : १५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्या सामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र विनातिकीट प्रवास करणे सुरूच आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर ऑगस्ट महिन्यात प्रवाशांकडून दीड कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार ११ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान एकूण ३४,३९१ प्रवासी विनातिकीट पकडले गेले. मध्य रेल्वेने या प्रवाशांकडून १.४२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यापैकी १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान जवळपास १४,१०० जणांना दंड ठोठावण्यात आला. मध्य रेल्वेमार्गावर १५ ऑगस्टपासून दररोज विनातिकीट पकडलेल्या प्रवाशांची सरासरी संख्या २,३४८ होती, तर १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान दररोज १,४५० प्रवासी होते.
तर पश्चिम रेल्वेमार्गावर १३ ऑगस्टपासून १६७ प्रवासी विनातिकीट पकडले गेले. पश्चिम रेल्वेने या प्रवाशांकडून ३४.१२ लाख रुपये गोळा केले. १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत जवळपास ४,६२२ प्रवासी पकडले गेले, ज्यांच्याकडून १२.०५ लाख रुपये दंड म्हणून गोळा करण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, १५ ऑगस्टपासून पूर्णपणे लसीकरण केलेल्या लोकांसाठी रेल्वे प्रवास सुरू झाल्यापासून दररोज सरासरी ४० प्रवासी विनातिकीट पकडले जातात. १५ ऑगस्टपूर्वी, तिकिटाशिवाय पकडलेल्या प्रवाशांची सरासरी संख्या प्रति ६१० होती.