Join us

गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आता ५० लाखांपर्यंतचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:07 AM

मुंबई पाेलीस : प्रत्येक पोलीस ठाण्यातील टॉप २५ आरोपींची यादीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत गुन्हेगारी वृत्तीला आळा ...

मुंबई पाेलीस : प्रत्येक पोलीस ठाण्यातील टॉप २५ आरोपींची यादी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांनी चांगले वर्तन करावे म्हणून बॉण्ड भरून घेण्यात येणार आहे. याचे उल्लंघन करणाऱ्याला २५ हजार ते ५० लाखांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

मुंबईतल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात टॉप २५ गुन्हेगारांची यादी बनवण्यात येणार आहे. यात सराईत गुन्हेगार, चोर, खंडणीखोर, अपहरणकर्ते या सर्वांचाच समावेश असेल. करारामध्ये २५ हजार ते ५० लाखपर्यंतची रक्कम वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम अगोदर पाच हजार होती. मात्र ती कमी असल्यामुळे गुन्हेगार याकडे दुर्लक्ष करत होते.

मुंबईतल्या सर्व पोलीस ठाण्यामधील ३,०४३ गुन्हेगारांची यादी बनवण्यात आली आहे. करारामधील रकमेची तरतूद बॉण्ड भरणाऱ्याच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असणार आहे, असे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला रोख आणण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी वर्तवला.

.........................