लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई विभागात विनातिकीट / अनियमित प्रवासाच्या २.३८ लाख प्रकरणांत दंड म्हणून ७.६१ कोटी रुपयांची वसुली केली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १५ जून २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये सखोल व नियमित तिकीट तपासणी मोहीम चालविली. या तपासणीदरम्यान, विनातिकीट / अनियमित प्रवासाची २.३८ लाख प्रकरणे आढळून आली आणि त्यांतून दंड म्हणून ७.६१ कोटी रुपये वसूल करण्यात आले. यापैकी सुमारे १.७५ लाख प्रकरणे लोकल गाड्यांमध्ये आढळली आणि दंड म्हणून ५.१० कोटी रुपये आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील ६३ हजार प्रकरणांमधून २.५१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करणे यावर कारवाई करण्यात आली. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे केले आहे.