मुंबई : दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमामुळे रोजगाराची संधी मिळणार असून ‘कौशल्य सेतू अभियान’ हा उपक्रम देशभरात उल्लेखनीय ठरल्याचे शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांनी सांगितले.दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाद्वारे करिअरची संधी उपलब्ध करून देणाºया कौशल्य सेतू अभियानातील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी तावडे बोलत होते.आजच्या युवकांना काळानुरुप, रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. नापास हा शिक्का पुसून टाकण्यासाठी राज्य शासनाने राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करत या कौशल्य सेतू अभियानाद्वारे विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कौशल्य सेतू अभियानामध्ये दहावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी)चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.
कौशल्य सेतूमुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मिळणार रोजगाराची संधी - तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:59 AM