Join us

हिवाळ्यात बोटांना सूज आली तर? ‘हे’ करा उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:03 AM

हिवाळा ऋतू  अनेकांना आल्हाददायक वाटत असला तरी या काळात मोठ्या प्रमाणात आजाराचे प्रमाण वाढलेले असते.

मुंबई : हिवाळा ऋतू  अनेकांना आल्हाददायक वाटत असला तरी या काळात मोठ्या प्रमाणात आजाराचे प्रमाण वाढलेले असते. सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात डॉक्टरांकडे जात असतात. 

विशेष म्हणजे या काळात ज्यांना श्वसनविकाराचे आजार आहेत त्यामध्ये दमा आणि अस्थमा याचे  प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. त्यासोबत हाडाचे ज्यांना जुनाट आजार आहेत त्यांचे आजारही या काळात दिसून येतात, तसेच काही नागरिकांची बोटे या काळात सुजतात. त्यापैकी काही जणांना संधिवाताचा त्रास जाणवतो. काही जणांना यामुळे मोठ्या प्रमाणात वेदना होतात.

बोटे का सुजतात? 

 अनेकांना संधिवाताचा त्रास असतो त्यामुळे या काळात बोटे सुजतात.  काहींना कॅल्शियमची कमी असते त्यामुळेसुद्धा हा आजार होतो. थंडी असल्याने नसा आकुंचन पावतात त्यामुळे हा आजार जाणवतो.   

काय करावे? 

हा आजार नेमका कशामुळे होतो यासाठी काही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात. त्यानंतर निदान झाल्यावर तत्काळ या आजारांवर उपचार करणे शक्य आहे. अनेक जण घरगुती उपाय अगोदर करतात. मात्र, त्यात त्याचे समाधान न झाल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

काही वेळा थायरॉइड आणि युरिक ॲसिड वाढल्यानेसुद्धा हाताची बोटे सुजतात. त्यामुळे रुग्णांना सांगितलेल्या लक्षणांचा अभ्यास करून योग्य त्या चाचण्या करून रोगाचे निदान करावे लागते  अशा रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आढळून येते. - डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय

टॅग्स :मुंबईथंडीत त्वचेची काळजी