वीज वितरणाचे काम वेळेत पूर्ण करा - संजीव कुमार
By admin | Published: May 26, 2017 03:37 AM2017-05-26T03:37:56+5:302017-05-26T03:37:56+5:30
जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेण्यांना महावितरणमार्फत विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेण्यांना महावितरणमार्फत विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. समुद्राने वेढलेल्या या बेटास ‘मरिन केबल’द्वारे (समुद्राखालून) वीज पुरवण्यात येणार आहे. हा प्रयोग राज्यात प्रथमच होत आहे. त्यामुळे हे काम अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व वेळेत होण्याच्या दृष्टीने महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी या प्रकल्पाची पाहणी केली.
समुद्राखालून टाकण्यात येणारी केबल व त्याची यंत्रणा, घारापुरी बेटावर बसवण्यात येणारे तीन ट्रान्सफॉर्मर व त्यांचे ठिकाण, बेटावरील वीज वितरणाच्या जाळ्याची पाहणी करत कुमार यांनी वीज वितरणाचे काम वेळेत पूर्ण करा, असे आदेश दिले. महावितरणमार्फत न्हावा येथील टी.एस. रेहमान या अंतिम टप्प्यात असलेल्या सब-स्टेशनमधून घारापुरी बेटास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी समुद्राखालून सात किलोमीटर लांबीच्या चार वीज वाहिन्या टाकण्यात येत आहेत. या वाहिन्यांतून २२ केव्हीचा वीजपुरवठा घारापुरी बेटास करण्यात येणार
आहे. आतापर्यंत सुमारे दोन
किमी लांबीची केबल टाकण्यात आली आहे.