Join us

समीर वानखेडेंविरोधातील एफआयआर योग्यच; सीबीआयचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 6:01 AM

सीबीआयने वानखेडेंच्या याचिकेवर आक्षेप घेतला असून याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेले  एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. वानखेडे यांच्या विरोधातील एफआयआर योग्यच असल्याचा दावा करत सीबीआयने मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. इतकेच नव्हे तर सीबीआयने वानखेडेंच्या याचिकेवर आक्षेप घेतला असून याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून सोडून देण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुखकडे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने वानखेडेंविरोधात एफआयआर दाखल केला असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. गेल्या सुनावणीत खंडपीठाने सीबीआयला वानखेडेंच्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सीबीआयने प्रतिज्ञापत्र दाखल करत वानखेडेंच्या याचिकेला विरोध केला आहे. तसेच वानखेडेंविरोधातील  एफआयआर योग्यच असल्याचा दावा केला आहे. वानखेडेंविरोधात विविध कलमांतर्गत दाखल गुन्हे प्रथमदर्शनी योग्य आहेत असेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

 

टॅग्स :समीर वानखेडेगुन्हा अन्वेषण विभागसीबीआयकेंद्रीय गुन्हे अन्वेषणउच्च न्यायालयमुंबई हायकोर्ट