मुंबई - एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर हस्तमैथुन केल्या प्रकरणी रविवारी अंधेरी पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला आहे अशी माहिती मुंबई पोलीस दलातील डीसीपी दीपक देवराज यांनी दिली. गुरुवारी दुपारी एक व्यक्ती मेट्रो स्टेशनवरच्या जिन्याजवळ हस्तमैथुन करत असल्याचे महिलेला आढळले.
मेट्रो स्थानकात प्रवेश केल्यानंतर मी एका व्यक्तीला हस्तमैथुन करताना पाहिले. माझ्याआधी दोन महिलांनी सुद्धा हे दृश्य पाहिले व त्यांनी रेल्वे स्टेशनवरच्या सिक्युरिटीला माहिती दिली. सुरक्षारक्षक या व्यक्तीच्या दिशेने गेल्यानंतर तो शिडीवरुन खाली उतरुन पळून गेला. सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला पकडण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. फक्त तो तिथून निघून जाईल एवढेच पाहिले असे तक्रार दाखल करणा-या महिलेने म्हटले आहे.
या महिलेने घाटकोपर मेट्रो स्थानकात लिखित तक्रार दिली त्यानंतर टि्वटरवरुन मेट्रोच्या अधिका-यांना माहिती दिली. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने या टि्वटला प्रतिसाद देताना म्हटले आहे कि, तुमचा मेसेज मिळाला. प्रवाशांची सुरक्षा मुंबई मेट्रोसाठी सर्वात महत्वाची आहे. आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेतली असून, असे प्रकार रोखण्यासाठी उपायोजना सुरु केल्या आहेत. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुम्हाला पोलीस तक्रार दाखल करण्याची विनंती करतो असे मुंबई मेट्रोने म्हटले आहे.