Mumbai CST Bridge Collapse: रेल्वे अन् महापालिकेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 07:35 AM2019-03-15T07:35:39+5:302019-03-15T12:29:32+5:30
महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला.
मुंबई: महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, 30हून अधिक लोक जखमी झाले. जखमींची प्रकृतीही गंभीर आहे. या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम 304 एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Maharashtra: Morning visuals from the spot where part of a foot over bridge near CSMT railway station collapsed in Mumbai yesterday. 6 people had died in the incident. pic.twitter.com/4qQ909Zznc
— ANI (@ANI) March 15, 2019
ही दुर्घटना घडल्याने स्ट्रक्चरल ऑडिट प्रक्रियेचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट व दुरुस्ती कामांमध्ये निष्काळजी केल्याचे आढळल्यास त्यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ही संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यापूर्वी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये या पुलाचेही ऑडिट करण्यात आले होते. पालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ऑडिटमध्ये हा पूल योग्य स्थितीत असल्याचे आढळले होते, तथापि त्यामध्ये किरकोळ दुरुस्ती कामे सुचविण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.