मुंबई : पाकमोडीया स्ट्रीट येथील हुसैनी इमारतीच्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेला होता. या दुर्घटनेप्रकरणी १३ दिवसांनंतर गुरुवारी सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११मध्ये ही इमारत सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने विकत घेतली. त्यानंतर २८ मार्च २०११ ते ३१ आॅगस्ट २०१७पर्यंत एसबीयूटीला ही इमारत धोकादायक असून, ती पाडण्यात यावी याबाबत म्हाडाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. इमारत धोकादायक असून, ती केव्हाही कोसळू शकते याबाबत जाणीव असतानाही एसबीयूटीने त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच इमारत रिकामी केली नाही. ३१ आॅगस्ट रोजी हुसैनी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेला तर १६ जण जखमी झाले. या प्रकरणी प्राथमिक तपासात आढळलेल्या त्रुटींच्या निकषांवरून गुरुवारी एसबीयूटीसह त्यांच्या संबंधित पदाधिका-यांविरुद्ध ३०४ (२), ३३७, ३३८ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आनंद दत्तात्रय देशमुख (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जखमी, प्रत्यक्षदर्शी, म्हाडा, महापालिका तसेच संबंधित यंत्रणेतील अधिकारी वर्गाचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. चौकशीअंती संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जे.जे. मार्ग पोलिसांनी दिली.
‘बु-हानी ट्रस्ट’वर गुन्हा दाखल, हुसैनी इमारत दुर्घटना; १३ दिवसांनंतर झाली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 4:49 AM