६० मजल्यांच्या ‘अविघ्न’मध्ये १४ महिन्यांत पुन्हा अग्नितांडव! तीन मजल्यांना झळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 07:35 AM2022-12-16T07:35:38+5:302022-12-16T07:35:50+5:30

सुदैवाने जीवितहानी नाही; तीन मजल्यांना झळ, आगीचे कारण अस्पष्ट

Fire again in 14 months in 60-storey 'Avighna'! Three floors burned | ६० मजल्यांच्या ‘अविघ्न’मध्ये १४ महिन्यांत पुन्हा अग्नितांडव! तीन मजल्यांना झळ

६० मजल्यांच्या ‘अविघ्न’मध्ये १४ महिन्यांत पुन्हा अग्नितांडव! तीन मजल्यांना झळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : करी रोड येथील अविघ्न पार्क टॉवरच्या २२ व्या मजल्यावर गुरुवारी सकाळी पुन्हा आग लागली. आग लागलेल्या फ्लॅटमध्ये कोणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेनंतर टॉवरमधील फ्लॅट रिकामे करण्यात आले. दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर 
आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

लालबाग येथील महादेव पालव मार्गाजवळ ६० मजल्यांचा अविघ्न पार्क टॉवर आहे. गेल्या वर्षी २२ ऑक्टोबरला १९ व्या मजल्यावर आग लागली होती. १९ व्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे  सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता.  गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास २२ व्या मजल्यावर आग लागली. या घटनेची माहिती इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव  घेत २२ वा मजला गाठला. फ्लॅट बंद असल्याने जवानांनी दरवाजा तोडला व घरातील आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीच्या  ज्वाळा इतक्या भयावह होत्या की, घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. 

एवढेच नव्हे तर आगीची झळ २३ व २४ व्या मजल्यालाही बसली. धुरामुळे वरच्या दोन्ही मजल्यांवरील बाल्कनीचे सिलिंग काळवंडले. इमारतीतील अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने जवानांनी अडीच ते तीन तासांत आग विझविली.

रहिवाशांना असे काढले बाहेर
आगीची माहिती मिळताच इमारत रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. इमारतीत १४ लिफ्ट असून आग लागलेल्या विंगची लिफ्ट बंद करण्यात आली होती. २५ व्या मजल्यावर रेफ्यूजी एरिया असून वरच्या मजल्यावरून या लोकांना २५ व्या मजल्यावर आणण्यात आले. तेथून दुसऱ्या विंगमधून त्यांना तळ मजल्यावर हलवण्यात आले.

१० गाड्या, ६० अग्निशमन कर्मचारी
आग विझविण्यासाठी  ४ फायर इंजिन, ४ जम्बो टँकर्स, १ हायड्रोलिक प्लॅटफॉर्म असलेली गाडी व १ वॉटर टॉवर वाहनाची मदत घेण्यात आली. याशिवाय अग्निशमन 
दलाचे जवान व अधिकारी असे एकूण ६० जणांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

दोन अग्निशमन जवान जखमी
आगीच्या ज्वाळा तीव्र असल्याने ती विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. आग विझवताना रामदास सणस (३७) आणि महेश पाटील (२६) हे दोघे जवान किरकोळ जखमी झाले. त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले.

या टॉवरला लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष मेहनत घेतली व आग नियंत्रणात आणली.     - संजय मांजरेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी
 

Web Title: Fire again in 14 months in 60-storey 'Avighna'! Three floors burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग