पंकज राऊत, बोईसरतारापूर एमआयडीसीतील प्लॉट नं. एन ४४ मधील अंबानी आॅर्गनिक्स प्रा. लि. या कारखान्यात बुधवारी संध्याकाळी लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कारखान्याचा मार्जिन स्पेस अवैधरित्या चारही बाजूने बंद केल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाच तास झुंज द्यावी लागली तर ही भीषण आग कुलींग करण्याकरीता आणखी पाच तास अशा सलग दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग काबूत आली.अंबानी आॅगीनिक्स या कारखान्यात कपड्याच्या फिनिशींग करीता लागणारे टेक्स्टाईल बायंडर आणि आॅईल पेंट बनविण्याकरीता लागणारे पेंट बायंडर हे रॉ मटेरीयल तयार करण्यात येत असून आग विझवित असताना रसायनांनी भरलेल्या दोन पिंपाचे मोठे स्फोट झाले. तारापूर एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी भारत कापसे यांनी सांगितले की, कारखान्यातील रिअॅक्टर आगीत कोलॅप्स झाला त्या रिअॅक्टरचे झाकणही सुदैवाने उघडे होते. नाहीतर रिअॅक्टर मधील दाब वाढून त्याचा स्फोट झाला असता तर भीषण अवस्था झाली. आग विझविण्याकरीता तारापूर एमआयडीसीचे तीन अग्निशमन बम्ब कार्यान्वित होते तरीही आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून रात्री आठच्या सुमारास तारापूर अणूऊर्जा केंद्र व डहाणूत रिलायन्स थर्मल पॉवर यांच्याकडून प्रत्येकी एक फायर इंजिन मागविले. असे एकूण पाच फायर इंजिन तर विजय पिंपळे व कुंदन संखे यांचेही पाण्याचे तीन टँकर अग्निशमन दलाला पाणी आणून देण्याकामी मदत करीत होते. दोन लाख लिटर पाणी तर एक हजार लिटर फोम आग विझविण्यास वापरावा लागला. तर अग्निशमन दलाचे तीन अधिकारी व १४ फायरमन असे एकूण १७ कर्मचारी आगीशी झुंज देत होते. घटनास्थळी बोईसरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश पाटील हजर होते व नागरीकांच्या मदतीने तेही शर्थीने प्रयत्न करीत होते.
अंबानी आॅर्गनिक्सला आग, विझवायला लागले पाच तास
By admin | Published: February 26, 2015 11:05 PM