Join us

मुंबईतील भाजपा कार्यालयाला आग; वेल्डिंग करताना शॉर्ट सर्किट, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 5:24 PM

Fire Broke In BJP Mumbai Office: भाजपा कार्यालयाला आग लागल्याचे कळताच काही नेते, पदाधिकारी पोहोचले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Fire Broke In BJP Mumbai Office: भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील मुख्य कार्यालयात आग लागल्याची घटना समोर येत आहे. भाजपा कार्यालयात नुतनीकरणाचे काम सुरू असून, वेल्डिंगचे काम करत असताना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरल्याचे सांगितले जात आहे. तसेच कार्यालयात कागदपत्रे आणि लाकडी सामान असल्यामुळे ही आग वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपाचे मुंबईतील कार्यालय नेहमी गजबजलेले असते. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठी वर्दळ असते. मात्र, रविवार असल्यामुळे कार्यालयात फारसे कुणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असे सांगितले जात आहे. 

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या

भाजपा कार्यालयात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही वेळात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कार्यालयात कोणीही अडकलेले नाही, असे म्हटले जात आहे. सोशल मीडियाचे कर्मचारी वगळता कुणीही कार्यालयात नव्हते. आग लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ऑफिसबाहेर धाव घेतली. नरिमन पॉईंटवरील भाजपाचे कार्यालय हे प्रमुख कार्यालय असल्याने त्या ठिकाणी पक्षाशी संबंधित मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि इतर प्रचार साहित्य असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार प्रसाद लाड कार्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माध्यमांशी बोलत असताना प्रसाद लाड म्हणाले की, कार्यालयात आग लागल्यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगीवर नियंत्रण अग्निशामक साहित्याचा वापर केला. ही आग मुख्य कार्यालयात लागली नसून कार्यालयाच्या मागच्या बाजूस लागली होती. त्यामुळे कार्यालयाचे फार नुकसान झालेले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :भाजपामुंबईआगअग्निशमन दल