अंधेरीत अग्नितांडव; इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:26 AM2024-10-16T10:26:00+5:302024-10-16T10:44:24+5:30
अंधेरीत एका इमारतीमध्ये लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला.
Andheri Fire : मुंबई पुन्हा एकदा आगीची भीषण घटना समोर आली आहे. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील एका इमारतीमध्ये लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये ही आग लागली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असली तरी तिघांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबईतीलअंधेरी पश्चिम येथील इमारतीला आज सकाळी आग लागली. अग्निशमन दल आणि पोलीस सेवा घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणली असून सध्या कुलिंग ऑपरेश सुरु आहे. या आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वृद्ध आणि एका व्यक्तीचा समावेश असल्याचे समोर आलं आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.
Three persons killed after fire breaks out in a building in Mumbai's Lokhandwala Complex: Civic officials
— Press Trust of India (@PTI_News) October 16, 2024
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आग मोठी नव्हती. मात्र या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांसह तिघांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. चंद्रप्रकाश सोनी (७४), कांता सोनी (७४) आणि पेलुबेता (४२) अशी मृतांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने फायर इंजिन, हायड्रंट्स, टर्नटेबल शिडी आणि रुग्णवाहिका यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. सात सदस्यांच्या मृत्यूचे कारण बनले. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत रविवारी 6 ऑक्टोबरला आग लागली होती, ज्यात एका संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला होता. तीन मजली घरामध्ये २५ लिटर रॉकेलचे आणि पाम तेलाचे अनेक कॅन सापडले, ज्यामुळे आग वेगाने पसरली असावी. या आगीतून घरातील केवळ दोन जणांचा वाचवण्यात यश आलं होतं.