विक्राेळीत डॉ. आंबेडकर रुग्णालयाला आग; आयसीयूतील रुग्णांना तत्काळ हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 07:12 AM2024-01-22T07:12:11+5:302024-01-22T07:12:40+5:30
विक्रोळीतील टागोर नगर परिसरात महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे.
मुंबई : विक्रोळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र मोठ्या प्रमाणात साहित्यांचे नुकसान झाले असून, तेथे दाखल असलेल्या दोन रुग्णांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
विक्रोळीतील टागोर नगर परिसरात महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे. रुग्णालयातील तळ मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागातून अचानक धूर निघू लागला. ही बाब तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले आणि अतिदक्षता विभागातील सहा रुग्णांना बाहेर त्वरित बाहेर काढले. धुरामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते.
थाेडक्यात माेठी दुर्घटना टळली
अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे दुर्घटना टळली. घटनेवेळी अतिदक्षता विभागात सहा रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील शिवाजी ढाले (६५), विमल तिवारी (६०) या रुग्णांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तर यशोदा राठोड (५८), कांताप्रसाद निर्मल (७५), अरुण हरिभगत (६४), सुश्मिता घोकशे (२३) यांच्यावर तेथेच उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश गोसावी यांनी दिली.