अरुंद रस्ता, चिंचाेळ्या गल्ल्यांतून मार्ग काढणार फायर बाइक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:08 AM2020-12-30T04:08:29+5:302020-12-30T04:08:29+5:30
४० लीटर पाणी साठवण्याची क्षमता लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अरुंद रस्ता, चिंचाेळ्या गल्ल्यांमुळे अनेकदा अग्निशमन दलाच्या पथकाला मदतकार्यात ...
४० लीटर पाणी साठवण्याची क्षमता
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अरुंद रस्ता, चिंचाेळ्या गल्ल्यांमुळे अनेकदा अग्निशमन दलाच्या पथकाला मदतकार्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागताे. सन २०१६ मधील काळबादेवीतील आगीच्या घटनेनंतर फायर बाइक्सचा प्रस्ताव चर्चेत आला. मात्र एकच निविदा आल्याने गेल्या वर्षी बाइक्स खरेदी लांबणीवर पडली. सध्या प्रत्येकी ४० लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पाच फायर बाइक्स अग्निशमन दलात दाखल होणार आहेत.
२०१६ मध्ये काळबादेवी येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेथील अरुंद रस्ते आणि चिंचोळ्या गल्ल्यांमुळे मदतकार्य वेळेत पोहोचविणे अग्निशमन दलाला अशक्य झाले होते. त्यामुळे फायर बाइक्स घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र एकच निविदा आल्याने संबंधित प्रस्ताव स्थायी समितीने फेरविचारासाठी प्रशासनाकडे पाठविला होता. त्यानुसार अग्निशमन दलाने गेल्या महिन्यात पुन्हा एकदा नव्याने निविदा मागविल्या.
मात्र गेल्या अनुभवावरून या वेळी केवळ पाच फायर बाइक खरेदी करण्यात येणार आहेत. नवीन बाइकची किंमत प्रत्येकी १० लाख रुपये आहे. नवीन वर्षात या बाइकची खरेदी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येईल. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यास २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी एक बाइक खरेदी करण्यात येईल. अरुंद रस्ते, चिंचाेळ्या गल्ल्यांमधून या बाइक सहज मार्ग काढू शकणार असल्याने दुर्घटना स्थळाचा अंदाज घेऊन मदत पोहोचविणेे शक्य होईल.
* एका मिनिटात आठ लीटर पाण्याची फवारणी
- फायर बाइकमध्ये ४० लीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. या बाइकवर दाेन जवान असतील, या बाइक मिनी फायर स्टेशनमध्येच उभ्या करण्यात येणार आहेत.
- या बाइकला जोडलेल्या स्प्रेद्वारे आगीच्या ठिकाणी एका मिनिटाच्या कालावधीत आठ लीटर पाण्याची फवारणी करणे शक्य होणार आहे.
- अग्निशमन दलाचे पाण्याचे टँकर व आगीचे बंब वाहतूककोंडीतून मार्ग काढत घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी या बाइक्स तेथे पोहोचतील. परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार मदत करतील.
..............................