मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील जवाहर उपाहारगृहामध्ये आग लागल्यानंतर धुराचे लोट दिसल्यानंतर प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि पळापळ झाली. बुधवारी दुपारी ३ वाजून १९ मिनिटांनी ही आग लागली. आग लागताच तत्काळ स्थानकातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत स्टेशनच्या प्रतीक्षागृहापर्यंत आग पसरली होती, असे प्रवाशांकडून सांगण्यात आले. शिवाय स्थानकाबाहेरून धुराचे लोट पाहायला मिळाले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरून गोंधळ झाला. दरम्यान, ५ वाजून २४ मिनिटांनी अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच मध्य रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून एलटीटी स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे रेल्वेगाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
प्रतीक्षागृह आणि अनाउन्समेंट सेंटर ही मोकळे करण्यात आले, त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली.
उपाहारगृहाच्या २,००० ते २,५०० चौरस फुटाच्या जागेत असलेले इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी वस्तू, लाकडी टेबल, ऑफिस दस्तऐवज अशा वस्तूंमुळे आग पसरल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
तीन वाहनांचा कोळसा :
अंधेरीमधील महाकाली लेणी मार्गावरील ‘ट्रान्स रेसिडेन्सी’ इमारतीच्या मागील परिसरात मंगळवारी मध्यरात्री २:३० च्या सुमारास तीन वाहनांना अचानक आग लागली. ही तिन्ही वाहने आगीत खाक झाली.
या दुर्घटनेत फारुख सिद्दीकी (४५) गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. या आगीत दोन कार आणि अन्य एक वाहन जळून खाक झाले.
मध्यरात्री २ वाजून ४४ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत जखमी फारुख सिद्दीकी यांना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, आगीत ९० टक्के भाजलेल्या सिद्दीकी यांना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले.