मुंबई - कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नाही. तिथे हुक्का पिणा-यांमुळे ही आग भडकल्याचे टि्वट नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांनी या अग्नि दुर्घटनेच्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यशदर्शी मित्राच्या हवाल्याने हे टि्वट केले आहे. मोजो आणि वन अबाव्ह ही दोन रेस्टॉरन्ट या अग्नितांडवाला जबाबदार आहेत. त्यांच्याकडे खानपानाचा परवाना असताना ही रेस्टॉरन्टस आपल्या ग्राहकांना हुक्का कसा काय देऊ शकतात ? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
फक्त रेस्टॉरन्ट मालकांना का जबाबदार धरायचे ? महापालिकेला का नाही, नियमांचे उल्लंघन होत असताना महापालिकेने काहीच केले नाही. दोघेही या दुर्घटनेसाठी समान जबाबदार आहेत. मुंबईत अनेक रेस्टॉरन्टस नियमांचे पालन करत नाहीत. स्थानिक महापालिका अधिका-यांना लाच देऊन नियमातून सटकतात. आता चौकशीचे आदेश दिले जातील. जे जबाबदार आहेत त्यांना साधी शिक्षाही होणार नाही. अशा अनेक कमला मिल प्रतिक्षेत असून काहीच बदलणार नाही असे नितेश राणे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
लोअर परेल येथील कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडवात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला. त्यात महिलांची संख्या जास्त आहे. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस या चार मजली इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस पबमध्ये सर्वप्रथम आग भडकली. त्यानंतर लगेचच या आगीने रौद्ररुप धारण करत वेगाने ही आग पसरली.
आग भडकल्यानंतर प्रत्येकजण स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटला. एकच गोंधळ सुरु झाल्याने सुरक्षित जागा शोधताना महिला पुरुषांच्या वॉशरुममध्ये घुसल्या. तिथे खेळती हवा नसल्याने नाका, तोंडात धुर जाऊन गुदमरुन मृत्यू झाला. न्यूज 18 वृत्तवाहिनीने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या चार मजली इमारतीत रेस्टॉरंट, पब आणि ऑफीसेस आहेत. जळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले.