अग्निशमन दलाचा पर्यावरणस्नेही गणेश!
By admin | Published: September 23, 2015 02:35 AM2015-09-23T02:35:45+5:302015-09-23T02:35:45+5:30
लोकमान्य टिळकांनी सामाजिक ऐक्यासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे भान जपत मुंबई अग्निशमन दल गेल्या ६९ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करीत आहे.
मुंबई : लोकमान्य टिळकांनी सामाजिक ऐक्यासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे भान जपत मुंबई अग्निशमन दल गेल्या ६९ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करीत आहे. संपूर्ण दलात एकच मंडळ कार्यरत ठेवत जवानांनी ऐक्याचे उदाहरण समोर ठेवले आहे. शिवाय सहा फुटांची पर्यावरणस्नेही मूर्ती साकारून जवानांनी सर्वच मंडळांना एका आदर्श मंडळाचा दाखलाच दिला आहे.
१९४७ सालापासून मुंबईतील ३४ अग्निशमन केंद्राचे ‘मुंबई अग्निशमन दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ प्रतिनिधित्व करीत आहे. मंडळामार्फत भायखळा अग्निशमन केंद्रात गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सवात आवश्यक मंडप आणि सजावटीचे काम दलाचे जवान आॅनड्युटी असताना करतात. त्यासाठी महिनाभर त्यांची धावपळ सुरू असते. महत्त्वाची बाब म्हणजे सहा फुटांची इकोफ्रेंडली मूर्ती साकारण्याचे कामही जवानांनी स्वत:कडेच घेतली आहे.
गणपतीच्या १० दिवसांत भायखळा अग्निशमन केंद्रात अनेक कार्यक्रमांची मेजवानी असते, ज्याचा आनंद अग्निशमन दलातील जवान आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबांनाही घेता येतो. यंदाही मंडळाने कर्मचारी महिला आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांसाठी व मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. शिवाय प्रवचन, कीर्तन, भजन अशा कार्यक्रमांची रेलचेलही केंद्रात सुरू आहे. (प्रतिनिधी)