Join us

विरार स्टेशनमध्ये आगीचा भडका

By admin | Published: August 17, 2016 5:00 AM

विरार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १वरील केबल नियंत्रण कक्षाच्या बाहेर ऐन गर्दीच्या वेळी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे

वसई : विरार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १वरील केबल नियंत्रण कक्षाच्या बाहेर ऐन गर्दीच्या वेळी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागल्याने विरार स्थानकात एकच गोंधळ उडाला. आग आटोक्यात आल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे विरार ते वसईदरम्यानची लोकल वाहतूक ठप्प झाल्याने लाखो प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वसई-विरार पालिकेने विरार ते वसईदरम्यान बस सोडल्या.विरार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १वरील केबल नियंत्रण कक्षाच्या बाहेर असलेल्या विद्युत वाहिन्यांमध्ये अचानक शॉकसर्किट होऊन आग लागली. विद्युत वाहिन्यांनी पेट घेतल्याने फटाक्यासारखा आवाज होत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आग लागण्याच्या काही मिनिटे आधीच याच फलाटावर एक लोकल आल्याने मोठी गर्दी होती. केबल जळत असताना होणारा प्रचंड आवाज आणि त्यानंतर आगीचे रौद्र रूप पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली व एकच पळापळ झाली. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवून फलाट रिकामा केला. ही आग तब्बल २५ मिनिटे भडकलेली होती. रेल्वे आणि वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान पोहोचताच अवघ्या १० मिनिटांत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने प्रचंड आग लागली असतानाही प्लॅटफॉर्म क्रमांक १वर असलेल्या लोकलला आगीची झळ पोहोचली नाही. या आगीत कुणीही जखमी झाले नाही. खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाने विद्युत पुरवठा बंद करून कामाला सुरुवात केली. विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याने ७पासून विरार ते वसईदरम्यान लोकल सेवा बंद करण्यात आली होती. या आगीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊन विरार व पुढे डहाणूपर्यंतच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. (प्रतिनिधी)