वनसंपदा नष्ट करण्यासाठी आरेत जंगलाला लावण्यात आली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 06:04 AM2018-12-05T06:04:50+5:302018-12-05T06:05:00+5:30
सोमवारी सायंकाळी आरे कॉलनी परिसरातील जंगलाला लागलेल्या आगीत तेथील तीन ते चार किलोमीटरवरील जंगल जळून खाक झाले आहे.
मुंबई : सोमवारी सायंकाळी आरे कॉलनी परिसरातील जंगलाला लागलेल्या आगीत तेथील तीन ते चार किलोमीटरवरील जंगल जळून खाक झाले आहे. आगीमुळे येथील वनसंपदा मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली असून, आग लागली नाही, तर लावण्यात आल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. या प्रकरणी वनविभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आग लागल्याची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली. सोशल नेटवर्क साईट्सवर आगीची छायाचित्रे, माहिती अपलोड होताच प्रशासनान वेगाने काम हाती घेतले. अग्निशमनचे जवान, शंभर स्वयंसेवक, स्थानिकांनी आग विझविण्याचे काम हाती घेतले. झाडांच्या फांद्या, वॉटर टँकरच्या मदतीने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविणे सुरू केले. वेगाने वाहणारे वारे अडचणीत भर घालत होते. रात्री साडेअकरा वाजता आग विझविण्यात यश आले.
दरम्यान, आगीमुळे जनावरे बाहेर येऊन मनुष्यवस्तीत घुसतील. त्यामुळे मनुष्य, प्राणी यांच्यातील संघर्ष वाढेल, त्यामुळेच ही आग लावण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
>‘वनविभागासह सरकारचा हलगर्जीपणा’
आग जवळच्या आदिवासी पाड्यात किंवा लोकवस्तीत पसरली असती, तर मनुष्यहानी झाली असती. याला जबाबदार कोण? एवढी आग लागेपर्यंत वनविभागाकडून कोणतीही यंत्रणा तेथे वेळेत पोहोचली नाही. परिणामी, यात वनविभाग आणि सरकारचा हलगर्जीपणा दिसून येतो. आग लागण्यामागे बिल्डर लॉबीचा हात आहे. वणवा जरी पेटला, तरी पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वणवा जात नाही, अशी माहिती पर्यावरणवाद्यांकडून देण्यात आली.
>जागा लाटण्याचा प्रयत्न
मुळात आग लागलेला परिसर हा आरे कॉलनीचा नव्हता. तो परिसर रहेजा कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूचा परिसर होता. रहेजा विकासकाने तेथे बांधकाम केले असून तेथील जागा लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. आग का लागली? कशी लागली? याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे.
- सुनील कुमरे, अध्यक्ष, मुंबई आदिवासी एकीकरण समिती
>एफआयआर दाखल
केला जात नाही
आगीमुळे आता वन्यजीव मानवी वस्तीत येणार आणि मानव-प्राणी संघर्ष सुरू होईल. प्रशासनाला पर्यावरणाबाबत कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता दिसत नाही. वृक्षतोड, भरणी इत्यादी गैरप्रकार जंगलात घडतात. त्याबाबत पोलिसांत एनसी घेतली जाते. मात्र एफआयआर दाखल केला जात नाही.
- नीलेश धुरी, अध्यक्ष,
जनआधार सामाजिक प्रतिष्ठान
>सुकलेल्या झाडांमुळेही बऱ्याचदा लागते आग
जंगलामध्ये झाडाला झाड घासल्याने आग लागते. तसेच जंगलात कोणी धूम्रपान करून विडी किंवा माचिसची काडी जंगलात टाकली तरीही आग लागते. जंगलात आग लागल्याने झाडांसह इतर वन्यप्राण्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. सुकलेल्या झाडांकडे वनअधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे सुकलेल्या झाडांमुळेही बºयाचदा आग लागते. जंगलातील आग ही हवेमुळे मोठ्या प्रमाणात पसरत जाते. जंगलातील आग आदिवासी बांधवांमुळे लागली, असे आरोप केले जातात. परंतु आदिवासी आग लागल्यावर प्राण्यांचा आणि आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करतात. जंगलामधील सुकलेली झाडे आदिवासी जळणासाठी वापरतात.
- देवेंद्र ठाकूर, अध्यक्ष, बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटना