दारुखाना येथील बॉम्बे टिंबर मार्टमध्ये लागली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दारुखाना येथील सिग्नल हिल अॅव्हन्यू रोडवरील बॉम्बे टिंबर मार्टमध्ये शनिवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ फायर इंजिन, ४ जम्बो टँकर्सच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
मुंबई शहर आणि उपनगरातील आगीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल ३ ठिकाणी आग लागल्याल्या घटना घडल्या. या तिन्ही आगीमध्ये मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली असून, सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील नंदधाम इंडस्ट्रीयल इस्टेट, नरिमन पॉइंट येथील जॉली मेकर चेंबर २ येथे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आणि लोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली.
लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पि - २ इमारतीला गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता पूर्णतः शमली, अशी माहिती अग्निशमन दालने दिली. येथे लागलेल्या आगीमुळे व्यावसायिक इमारतीच्या तळमजला, पहिला आणि दुसरा मजला आगीमुळे धूराच्या छायेखाली गेला होता. १४ फायर इंजिन, १२ जम्बो टँकरच्या मदतीने येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत ढाके नावाचे अग्निशमन अधिकारी जखमी झाले. त्यांच्यावर १०८ रुग्णवाहिकेत उपचार करण्यात आले.