भिकाऱ्याच्या घराला आग, लाखो रुपये जळून खाक
By admin | Published: January 13, 2016 09:05 PM2016-01-13T21:05:15+5:302016-01-13T21:05:15+5:30
राखेला खरंतर किंमत नसते, पण कल्याणमधील एका राखेची किंमत काल रात्रीपर्यंत लाखातच होती. कारण अब्दुल रहमान आणि त्यांची पत्नी फातिमा यांच्या घरात तब्बल तीन गोण्या भरुन पैसे होते.
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. १३ - भिकाऱ्याच्या घराला रात्री लागलेल्या आगीमुळे लाखो रुपये जळून खाक झाले आहेत. राखेला खरंतर किंमत नसते, पण कल्याणमधील एका राखेची किंमत काल रात्रीपर्यंत लाखातच होती. कारण अब्दुल रहमान आणि त्यांची पत्नी फातिमा यांच्या घरात तब्बल तीन गोण्या भरुन पैसे होते. दोघं रात्री जेवण-खाण करुन झोपी गेले आणि रात्री जाग आली तीच त्यांच्या झोपडीत लागलेल्या आगी मुळे.
तीन गोण्या पैसे घरात ठेवणारं झोडप झोपडपट्टीत का राहतं आणि एवढे पैसे कमावण्याचा त्यांचा उद्योग काय आहे, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. अब्दुल रहमान यांचं काम आहे रस्त्यावर भीक मागण्याचं आणि त्यातूनच त्यांनी लाखोंची रोकड जमा केली होती.
अब्दुल रहमान काही पहिल्यापासून भिकारी नव्हते. अगदी १० वर्षांपूर्वी ते खुर्च्या विणण्याचं काम करायचे. पण नंतर नजर कमी झाली आणि मुलंही सोडून गेली. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांसमोर हात पसरण्याची वेळ आली.
याआधी भिकाऱ्यांच्या अनेक चमत्कारीक आणि सुरस कथा समोर आल्या आहेत. अगदी करोडपती भिकारीही मुंबई-दिल्लीत राहतात, हे आपल्यासाठी नवीन नाही. पण कल्याणच्या लहुजीनगरच्या रहमान यांना मात्र नशीबानं दुसऱ्यांदा कंगाल केलं. पहिल्यांदा मुलं दुरावली आणि आता थेट तीन गोण्या पैशांची राख झाली. नशीबानं थट्टा मांडणं यापेक्षा वेगळं ते काय?