मुंबई : वांद्रे पश्चिम येथील महाराष्ट्र टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) इमारतीला लागलेल्या भीषण आगीतून ८६ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, घटनेच्या २२ तासांनंतरही ही आग धुमसतच होती. मंगळवारी दुपारनंतर अग्निशमन दलाने कूलिंग आॅपरेशन सुरू केले. या इमारतीतील तीन-चार मजले आगीने आपल्या कवेत घेतले होते. त्यामुळे आग कुठे धुमसत राहू नये, यासाठी प्रत्येक मजल्यांची तपासणी करण्यात आली.
वांद्रे पश्चिमेतील एस. व्ही. रोडवरील एमटीएनएल इमारतीच्या तिसºया मजल्यावर दुपारी ३.१५च्या सुमारास आगीचा भडका उडाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी गच्चीकडे धाव घेतल्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी मुंबई अग्निशमन दलावर होती. अशा प्रकारच्या देशातील पहिल्याच बचाव कार्यात तब्बल ८६ लोकांना आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, ही आग विझविण्यास तब्बल २२ तास लागले.
या इमारतीमध्ये पॉलिमर आणि प्लॅस्टिकच्या मोठ्या केबल्स, ट्रान्सफार्मर, स्वीचगेअर होते. आगीत या केबल्स जळल्यामुळे प्रचंड उष्णता आणि विषारी वायू निर्माण झाली होती. त्यामुळे ४५ पाउंडचे गणवेश चढवून जवानांना बचाव कार्य करावे लागत होते. अखेर दुपारी १२.५५ वाजता आग आटोक्यात आली. केबिन आॅफिस, फर्निचर, सर्व कार्यालयीन कागदपत्र, सर्व्हर रूम, खिडकी, दरवाजा, इलेक्ट्रिक वायरिंगने पेट घेतली होती. त्यामुळे आग विझल्यानंतरही कुठेतरी ठिणगी राहू नये, यासाठी संध्याकाळपर्यंत जवानांमार्फत कूलिंग आॅपरेशन सुरू होते.
संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते कूलिंग आॅपरेशनया इमारतीमधील दुसºया, तिसºया, पाचव्या, सातव्या आणि आठव्या मजल्यावरील फर्निचर, सर्व्हर रूम, घरगुती साहित्य, खिडक्या, दरवाजा, स्टिल रॅक, लाकडी रॅक, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक स्वीच गेअर्स, फॉल्स सिलिंग, स्टील फर्निचर, खुर्च्या, टेबल, संगणक जळले.
या इमारतीमध्ये मोठ्या केबल्स व इलेक्ट्रिक सामान असल्याने, आग विझल्यानंतरही कुठेतरी धुमसत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत कूलिंग आॅपरेशन सुरू होते.