आगीने राजकारण पेटले!

By admin | Published: February 2, 2016 02:22 AM2016-02-02T02:22:47+5:302016-02-02T02:22:47+5:30

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग सोमवारपर्यंत धुमसत होती. आता हा मुद्या केंद्रस्थानी ठेवून राजकारण्यांनी आपली पोळी भाजण्यास सुरुवात केली आहे

Fire burns politics! | आगीने राजकारण पेटले!

आगीने राजकारण पेटले!

Next

सचिन लुंगसे, मुंबई
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग सोमवारपर्यंत धुमसत होती. आता हा मुद्या केंद्रस्थानी ठेवून राजकारण्यांनी आपली पोळी भाजण्यास सुरुवात केली आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवर आगीच्या घटनास्थळाची आपापल्या पक्षातर्फे पाहणी करत राजकीय नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करणे सुरू केले आहे.
विशेषत: पालिकेतील विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांऐवजी प्रशासनावर आगीचे खापर फोडले आहे. कंत्राटदारांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. एकंदर प्रशासनाला धारेवर धरताना रंगलेल्या कुरघोडीमुळे डम्पिंगच्या आगीचे राजकारण पेटले आहे. स्थानिकांच्या आरोग्याला मात्र बगल दिली जात असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
डम्पिंगच्या आगीची पाहणी केल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, महापालिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही मुंबई पोलीस आयुक्तांसह महापालिका आयुक्तांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर धाबे दणाणल्यामुळे पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. शिवाय महापालिका आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र या सर्वांत कंत्राटदार नामानिराळे राहिले. पालिकेतील विरोधी पक्षांनी कंत्राटदारांना धारेवर धरत प्रशासनावर टीका केली आणि सत्ताधारी वर्गाला या प्रकरणाचे सोयरसुतक राहिले नसल्याची खंत व्यक्त केली.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका प्रशासन आणि कंत्राटदारांची हातमिळवणी आहे. कंत्राटदार पालिका प्रशासनाला जुमानत नाहीत, हे वास्तव आहे. देवनार येथील कंत्राटदाराची मुदत संपली आहे. मात्र प्रशासन यावर काहीच करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट अशी की, चार दिवस आगीच्या धुराने एवढे प्रदूषण होऊनही पालिका हातावर हात धरून बसून आहे. राष्ट्रवादी पार्टीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी सांगितले की, देवनार डम्पिंग ग्राउंडला आग लागली की लावली हा संशोधनाचा विषय आहे.
अग्निशमन दलाचा फौजफाटा तैनात
देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याला लागलेली आग नियंत्रणात आणि आटोक्यात आहे. डम्पिंगच्या मध्यभागी किंचितशी आग असली, तरी आता तीही आटोक्यात आली. या आगीतून निघणाऱ्या धुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना अवलंबिल्या जात आहेत. ‘निरी’च्या पर्यावरण अभ्यासकांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचा फौजफाटा तैनात आहे.
- प्रभात रहांगदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी
> देवनारच्या आगीने युतीमध्ये भडका
मुंबई : मरिन ड्राइव्हवरील एलईडी दिव्यांचा वाद ताजा असतानाच शिवसेना-भाजपा युतीमध्ये आता देवनार डम्पिंग ग्राउंड आगीवरून भडका उडाला आहे़ या आगीप्रकरणी मित्रपक्षानेच लक्ष्य केल्यामुळे शिवसेनेने भाजपावर हल्ला चढविला आहे़ शिवसेनेवर कचरा फेकण्याचे काम करू नये, तसे केल्यास जास्त कचरा त्यांच्यावर पडेल, असा सज्जड इशाराच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपाला दिला आहे़
देवनार डम्पिंग ग्राउंड धुमसत आहे़ या डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत़ तर भाजपा नेत्यांनी या आगीप्रकरणी शिवसेना नेत्यांना जबाबदार धरले़ ही टीका शिवसेनेचे स्थानिक खासदार शेवाळे यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधला़ आगीसाठी फक्त पालिका जबाबदार नाही़ तळोजा आणि ऐरोली येथे कचरा टाकण्याची परवानगी केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मिळालेली नाही़ कचरावेचकही आग लावत असतात़ भाजपा नेत्यांनी प्रथम याचा अभ्यास करावा, त्यानंतर शिवसेना जबाबदार असल्याचे वक्तव्य करावे, असे शेवाळे यांनी सुनावले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Fire burns politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.