Join us

फटाक्यांची दुकाने स्थानकापासून दूर करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 4:16 AM

अ‍ॅसिडसदृश पदार्थांचा स्फोट झाल्यानंतर कारवाई

मुंबई : अ‍ॅसिडसदृश पदार्थांचा स्फोट झाल्यानंतर रेल्वे प्रशासन जागे झाले आहे. प्रवाशांनी ज्वलनशील पदार्थ लोकलमध्ये घेऊन जाऊ नये, असे आवाहन मध्य रेल्वेच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून करण्यात आले आहे. यासह स्थानकाजवळील फटाक्यांची दुकाने हटविण्यास सुरुवात झाली.

माहिम-किंग्ज सर्कल दरम्यान लोकलमध्ये अ‍ॅसिडसदृश पदार्थांचा स्फोट झाला. या स्फोटात तीन प्रवासी भाजले. ऐन गर्दीच्या वेळी स्फोट झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यानंतर मध्य, पश्चिम रेल्वेने खबरदारीची पावले उचलली. ज्वलनशील पदार्थ बाळगून लोकल प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे प्रवाशांनी रॉकेल, पेट्रोल, डिझेल, फटाके घेऊन प्रवास करू नये, असे टिष्ट्वटरमार्फत आवाहन केले आहे.

रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात ‘ना फेरीवाला क्षेत्र’ आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारची दुकाने थाटली जाऊ शकत नाहीत. दिवाळीनिमित्त मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावरील स्थानकांबाहेरील १५० मीटर परिसरात फटाक्यांची दुकाने उभारली आहेत. मात्र रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, कुर्ला स्थानकाच्या पश्चिमेला फटाक्यांची खरेदी-विक्री सुरू आहे. मात्र फटाक्यांमुळे आगीची दुर्घटना होऊन मोठी वित्तहानी व जीवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे कुर्ला तसेच घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वांद्रे, माहिम, गोवंडी, मानखुर्द अशा भागात रेल्वे सुरक्षा बलाचे पथक आणि रेल्वे कर्मचारी जनजागृती करणार आहेत.

टॅग्स :फटाकेरेल्वेदिवाळीपोलिस