रुळावरील पाणी उपसण्यासाठी अग्निशमन दल येणार धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:34 AM2020-01-16T01:34:51+5:302020-01-16T01:35:05+5:30
पाणी तुंबलेल्या भागात पाच इंचांपर्यंत या वाहनातील पंप खाली जाऊ शकतो. आगीच्या दुर्घटनेत हे वाहन वापरले जाणार आहे.
मुंबई : पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी झाल्यास अग्निशमन दलाचे जवान मदतीला धावून येणार आहेत. रेल्वे रूळ आणि सखल भागांमध्ये पाणी तुंबून आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास पाणी उपसून बाहेर फेकणारे आधुनिक वाहन मुंबई अग्निशमन दलात दाखल होत आहे. चार हजार ते २० हजार लीटर पाणी उपसून काढण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईबाहेर अडकली होती. १७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या गाडीतील ९०० लोकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने बोट आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले होते. अशा घटनांच्या पुनरावृत्तीची भविष्यात शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे आधुनिक वाहन अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहे.
पूर्व, पश्चिम उपनगर आणि शहर विभागासाठी प्रत्येकी एक अशी तीन वाहने आॅगस्टपर्यंत अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. मानखुर्द, बोरीवली आणि भायखळा येथील केंद्रांत हे वाहन ठेवण्यात येईल. प्रत्येक वाहनाची किंमत सात कोटी रुपये आहे. यामध्ये पुरवठा, दोन वर्षांची हमी आणि पाच वर्षे देखभाल कालावधीचा समावेश आहे़
आग विझविण्यासाठी वापर
पाणी तुंबलेल्या भागात पाच इंचांपर्यंत या वाहनातील पंप खाली जाऊ शकतो. आगीच्या दुर्घटनेत हे वाहन वापरले जाणार आहे.
समुद्रकिनाऱ्याजवळ एखाद्या परिसरात आग लागण्याची घटना घडल्यास या वाहनाच्या मदतीने प्रति मिनिट दीड हजार लीटर पाणी खेचणे शक्य होईल.