मुंबई : विलेपार्ले येथील राम मंदिराच्या असलेल्या मैदानात ठेवलेल्या सामानाने शनिवारी पेट घेतला. ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणले गेले. आगीत मैदानाच्या सुरक्षाभिंतीलगत असलेल्या प्लॅटिनम इमारतीतील रहिवाशांना आगीचा फटका बसला. या आगीत त्यांच्या ५ दुचाकींसह पहिल्या मजल्यावरील रहिवाशांचा एसी जळून खाक झाल्या. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस अधिक तपास करत आहेत.
विलेपार्ले पूर्वेकडील सुभाष रोड परिसरात राम मंदिर आहे. याच मंदिराच्या मोकळ्या मैदानात विविध कापडी, लाकडी सामान ठेवण्यात आले होते. मैदानालगत प्लॅटिनम या सहा मजली इमारतीचे दोन विंग आहेत. शनिवारी रात्री उशिरा येथील सामानाने पेट घेतला. आगीच्या झळा येथील बी विंगच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्या. स्थानिकांनी सतर्कता बाळगत घरातील विद्युत पुरवठा खंडित करून रस्त्यावर धाव घेतली. घटनेची वर्दी लागताच अग्निशमन दलासह, विलेपार्ले पोलीस तेथे दाखल झाले. पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत मैदानाच्या सुरक्षाभिंतीलगत असलेल्या ५ दुचाकी जळून खाक झाल्या. तर पहिल्या मजल्यावरील एका घराचा एसी वितळून खाली पडला. रहिवाशांनी वेळीच बाहेर धाव घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीचे गूढ अद्याप कायम आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी घटनेची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
रहिवासी धास्तावले...आगीच्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक रहिवासी सुरेश भाटवडेकर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, या मैदानात मोठ्या प्रमाणात सजावटीचे सामान ठेवले जाते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जाते. त्यामुळे कंत्राटदाराकडून कुठल्याही स्वरूपाची खबरदारी न घेता या ठिकाणी ज्वलनशील सामान ठेवले जाते. भविष्यात अशी परिस्थिती उदभवू नये म्हणून पोलीस तसेच अग्निशमन दलाने यावर ठोस कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांनी सोमवारी विलेपार्ले पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांची भेट घेऊन यावर कारवाईची मागणी केली आहे.पोलिसांना अहवालाची प्रतीक्षाअग्निशमन दलाकडून आगीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तो अहवाल प्राप्त होताच, त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिली.