मुंबई : मुंबईतील जागेच्या टंचाईचा फटका अत्यावश्यक सेवांनाही बसू लागला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत अग्निशमन दलाची ताकद तोकडी पडत आहे, तसेच चिंचोळे मार्ग व अरुंद रस्त्यांमध्ये मदतकार्यात अनेक अडचणी येत असल्याने, महापालिकेने १७ छोटी अग्निशमन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी विभागस्तरांवर योग्य जागा मिळण्याची समस्या, बांधकामातील अडचणी आदीमुळे होणारा विलंब लक्षात घेऊन, आता ही छोटे अग्निशमन केंद्र कंटेनरमध्येच तयार करण्यात येणार आहेत.मुंबईत सव्वा कोटी जनतेच्या तुलनेत केवळ तीन हजार जवान व ३३ केंद्र असा अग्निशमन दलाचा ताफा आहे. दरवर्षी मुंबईत सरासरी साडेचार हजार ठिकाणी आगीच्या घटना घडतात. मात्र, मर्यादित फौजफाटा असूनही अग्निशमन दलावर आग लागणे, दरड व इमारत कोसळणे या आपत्तींबरोबरच झाडावर अथवा तारेमध्ये अडकलेल्या पक्ष्यांना सोडविणे ही जबाबदारीही आहे. त्यात झोपडपट्ट्यांमध्ये चिंचोळ्या मार्गातून आगीचा बंब नेणे जिकरीचे ठरते.काळबादेवी येथील गोकुळ निवास या इमारतीला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाले. या दुर्घटनेनंतर स्थापन तत्कालीन आयुक्त राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखालील वस्तुस्थिती, शोधक समितीने मुंबईत छोटी अग्निशमन केंद्र उभारण्याची शिफारस केली होती. त्यासाठी लागणारे वाहन मिस्ट फायर इंजिन व मनुष्यबळ देण्यात यावे, अशी शिफारस या समितीने केली होती. मात्र, जागा मिळत नसल्याने पालिकेने आता वाहनांसाठी शेड उभारून, अग्निशमन केंद्राचा कारभार कंटेनरमध्ये चालविण्याचा निर्णय घेतला आहे.शहरात १८ छोटी केंद्रे वाढविणार- मुंबईत केवळ ३३ अग्निशमन केंद्रे, तीन हजार जवान व अधिकारी असा अग्निशमन दलाचा ताफा आहे.- चिंचोळी रस्ते, अरुंद मार्गामुळे आगीच्या दुर्घटनेदरम्यान मदतकार्यात येतो अडथळा.- मिनी फायर टेंडर, तसेच क्विक रिस्पॉन्स मल्टिपर्पज वाहन या छोट्या केंद्रांसाठी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- या केंद्रांकरिता कॅटेनराइज आॅफिस खरेदी करण्यासाठी ठेकेदार नेमला, यासाठी पालिका दोन कोटी रुपये खर्च करणार.- मुंबईत सध्या ३४ केंद्रे आहेत. यामध्ये आणखी १८ छोटी केंद्रे वाढविण्यात येणार आहेत. वाहनांसाठी शेड बांधून त्यामध्ये हे कार्यालय सुरू होणार आहे.