मुंबईत आता 'रोबो' आग विझवणार, फायर ब्रिगेडला ड्रोन विमान मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 02:19 AM2018-02-05T02:19:19+5:302018-02-05T08:43:40+5:30
आगीचे प्रमाण वाढल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याची गंभीर दखल घेत, अग्निशमन यंत्रणा अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज करणे, जवानांना प्रशिक्षण देणे, त्यांना विम्याचे संरक्षण आणि अग्निसुरक्षेचे नियम मोडणा-यांवर करडी नजर ठेवण्यासाठी, स्थापन अग्निसुरक्षा पालन कक्षासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी राखून ठेवण्यात आला आहे.
मुंबई : आगीचे प्रमाण वाढल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याची गंभीर दखल घेत, अग्निशमन यंत्रणा अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज करणे, जवानांना प्रशिक्षण देणे, त्यांना विम्याचे संरक्षण आणि अग्निसुरक्षेचे नियम मोडणा-यांवर करडी नजर ठेवण्यासाठी, स्थापन अग्निसुरक्षा पालन कक्षासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी राखून ठेवण्यात आला आहे.
कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. निवासी व व्यवसायिक इमारतींमध्ये सुरक्षेचे नियम मोडून आगीशी खेळ सुरू असतात. हे आगीच्या घटनांनी दाखवून दिले आहे. मात्र, अग्निशमन दलाची ताकद मुंबईच्या लोकसंख्येपुढे तोकडी असल्याने, महापालिकेने मुंबईतील इमारतींमध्ये अग्निसुरक्षेची छाननी करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामार्फत मुंबईतील २ लाख ९८ हजार इमारतींची नियमित तपासणी करून, त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल. या कक्षात ७० केंद्र अधिकारी व ३५ जवानांसाठी पद निर्माण करण्यात आली आहेत, तसेच नियमित तपासणीसाठी या पथकाला २८ जीप पुरविण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलासाठी तरतूद करण्यात आलेल्या १८० कोटी ६२ लाख रुपयांपैकी या कक्षासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
>जवानांना प्रशिक्षण व विमा कवच : जवानांच्या प्रशिक्षणासाठी वडाळा येथे ड्रिल टॉवर आणि बहुउद्देशी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. जवानांच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. यासाठी महापालिका अथवा जवानांना पैसे भरावे लागणार नाहीत. या विम्याचे हप्ते जवानांचे वेतन जमा होत असलेल्या बँकेमार्फत ३० लाखांपर्यंत विम्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. अग्निशमन दलाच्या शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळणार आहे.
>अग्निशमन दलात ड्रोन
अग्निशमन दलास बळकट करण्यासाठी काही अद्ययावत उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी १५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यामध्ये आग विझविण्यासाठी रोबो आणि आगीचे आकाशातून निरीक्षण करणाºया ड्रोनचा समावेश आहे. मात्र, गेल्या वर्षी तरतूद करण्यात आलेल्या १६५ कोटींच्या तुलनेत उपकरणांच्या खरेदीसाठी कमी निधी ठेवण्यात आला आहे.