मुंबई : आमच्या इमारतीची बिल्डरने दुर्दशा केली. पाण्यासारखी जीवनावश्यक आणि पायाभूत सुविधाही येथे नाही. अनेक अडचणी आहेत. अग्निशमन यंत्रणाही ठप्प आहे. एकूणच भंगार स्थितीत आमची इमारत उभी आहे. सात निष्पाप रहिवाशांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या बिल्डरवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी... जय भवानी एसआरए इमारतीतील नागरिकांचा संताप बाहेर पडत होता...
इमारतीला शुक्रवारी आग लागून सातजणांचा गुदमरून मृत्यू झाला. ६८ जण जखमी आहेत. दुसऱ्या दिवशी या इमारतीची अनेकांनी पाहणी केली. त्यावेळी रहिवाशांचा संताप धुमसत होता. पालिकेच्या पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी आमच्या इमारतीतील आपद्ग्रस्त रहिवाशांची महापालिका शाळेत राहण्याची व्यवस्था केल्याचे येथील येथील रहिवासी दिलीप ओगानिया या तरुणाने सांगितले.
आम्हाला पाण्याचे कनेक्शन नाही, ओसी आहे; पण फायर सेफ्टी नाही. पालिकेने अनेक वर्षे आम्हाला पाण्यासाठी ताटकळत ठेवले. स्टक्चरल ऑडिट नसल्याने आग लागल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आमचा वीजपुरवठा बंद असल्याचे संजय तिरलोटकर यांनी सांगितले. जळलेले पाइप, ड्रेनेज, लाइट कनेक्शन, पाण्याचे मीटर, दुरुस्त करावे, नागरिकांसाठी लवकर सुविधांनी युक्त इमारत करावी, असे येथील इमारतीत राहणारे नंदकुमार पाटील यांनी सांगितले. बळवंत मल्लया यांची गाडी या आगीत भस्मसात झाली.
स्क्रीन प्रिंटिंगच्या व्यवसायाला आगीची झळ पोहोचून साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.