पनवेल : पनवेल नगरपालिकेच्या अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. प्रशिक्षित फायरमन नाहीत, त्यामुळे आगीशी सामना करण्याकरिता अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून पालिका प्रशासनाने अग्निशमन दल सक्षम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने फायरमनची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. पनवेल शहराचे क्षेत्रफळ वाढले नसले तरी या ठिकाणी लोकवस्ती आणि नागरीकरण वाढत आहे. रुग्णालये, दुकाने, मॉल्स आदींची संख्या शहरात वाढत आहे. त्याचबरोबर पनवेल शहराजवळून मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा द्रुतगती महामार्ग जातात. या व्यतिरिक्त परिसरातील कारखाने तसेच दुकानात दररोज लहान-मोठे अपघात होतात. शॉर्टसर्किटमुळे देखील आग लागल्याच्या घटना मोठ्याप्रमाणात घडतात. यावेळी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते. कर्मचारी बंब घेऊन घटनास्थळी पोहचतात, मात्र अनेकदा तांत्रिक अडचणींना सामोरे जाऊन त्यांना काम करावे लागते. संबंधित कर्मचाऱ्यांना गणवेश आणि गमबुटांशिवाय इतर सुरक्षा साहित्य दिले जात नाही. टोलेजंग इमारतीला आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडे कोणतीच यंत्रणा नाही. सद्यस्थितीत नगरपालिकेच्या अग्निशमन दलात केवळ १४ कर्मचारी आहेत. त्यामध्ये तीन फायरमन, पाच सहाय्यक फायरमन आणि तीन चालक आहेत. प्रत्येक पाळीनुसार १० कर्मचाऱ्यांची व पाच वाहनचालकांची गरज आहे. मात्र पदे रिक्त ठेवल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येतो, याबाबत अनेक महिन्यांपासून कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. याठिकाणी प्रशिक्षित फायरमन केवळ तीन आहेत. इतर फायरमन प्रशिक्षित नसल्याचे समोर आले आहे. कमी शिक्षणामुळे त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाला पाठविण्यात आलेले नाही. कमी प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना काय करावे, असा प्रश्न पडतो. त्यासाठी शास्त्रशुद्ध माहिती या कर्मचाऱ्यांना नसल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अग्निशमन दलाला प्रशिक्षित फायरमनची गरज असून त्यानुसार नगरपालिका प्रशासन हे पाऊल उचलणार आहे. (प्रतिनिधी)पंधरा कर्मचाऱ्यांची होणार भरती पनवेल नगरपालिकेच्या अग्निशमन दलात एकूण १५ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये १२ फायर फायटर, ३ चालकांचा समावेश आहे. कायमस्वरूपी भरतीला मंजुरी मिळाली नसल्याने सिडकोच्या धर्तीवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. फायर फायटरला १३ हजार आणि वाहनचालकाला १५ हजार रुपये वेतन देण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
अग्निशमन दल होणार सक्षम
By admin | Published: July 03, 2015 1:31 AM