महाड : महाड शहरातील बाजारपेठेमध्ये शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत चार दुकानांसह एक राहते घर भस्मसात झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल ५ तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. आगीत जवळपास ५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.शहरातील महात्मा गांधी मार्ग, प्रमुख बाजारपेठेतील कारंडे यांचे मोहन जनरल स्टोअर्स, गणेश वनारसे यांचे देव कलेक्शन, रमेश वनारसे यांचे रितेश स्टोअर्स, राजेश वनारसे यांचे कापडाचे दुकान व रवींद्र वनारसे यांचे कापडाचे दुकान आगीत जळून भस्मसात झाले. पहाटे सहा वा.च्या सुमाराला मोहन जनरल व देव कलेक्शन या दुकानातून अचानक आगीच्या ज्वाळा येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळविताना महाड न.पा.चे अग्निशमन कर्मचारी गणेश पाटील हे जखमी झाले. शिवपुण्यतिथी सोहळ्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड किल्ल्यावर येणार असल्याने नगर पालिकेचे व एमआयडीसीचे अग्निशमन दल त्याठिकाणी पाठविण्यात आले होते. तर दुसरे पथक नवेनगर येथील हेलिपॅडवर ठेवण्यात आले होते. आगीनंतर वीज पुरवठा खंडित झाल्याने पंपाने पाणी फवारणेही शक्य न झाल्याने आग विझवण्यास विलंब लागल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. सुमारे ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी १०.३० वा. च्या सुमारास अग्निशमन यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. आगीवर नियंत्रण मिळवित असताना अपुऱ्या साधनसामग्रीमुळे न.पा.चे अग्निशमन कर्मचारी गणेश पाटील हे किरकोळ जखमी झाले. बाजारपेठेतील आगीचे वृत्त समजताच माजी आ. माणिक जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन वनारसे, कारंडे कुटुंबीयांची आस्तेवाईकपणे चौकशी केली व पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत महाड न. पा.तील नगरसेवक व शहरातील मान्यवर उपस्थित होते. महाड शहरातील गेल्या काही वर्षात घडलेल्या आगीच्या घटना लक्षात घेता महाड न.पा. ने पूर्वीप्रमाणे शहरात फायर पॉइंटची पुन्हा निर्मिती करावी, अशी मागणी महाडकर नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)च्महाड शहरातील गेल्या काही वर्षात घडलेल्या आगीच्या घटना लक्षात घेता महाड न.पा. ने पूर्वीप्रमाणे शहरात फायर पॉइंटची पुन्हा निर्मिती करावी, अशी मागणी महाडकर नागरिकांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात महिन्याभरात आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
महाडमध्ये चार दुकानांना आग
By admin | Published: April 04, 2015 10:34 PM