माझगावमधील जीएसटी भवनला आग; जीवितहानी नाही, फाइल्स, नोंदी खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 06:07 AM2020-02-18T06:07:10+5:302020-02-18T06:07:33+5:30

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाची १६ फायर इंजिन

Fire at GST building in Mazgaon; No casualties, files, records entries | माझगावमधील जीएसटी भवनला आग; जीवितहानी नाही, फाइल्स, नोंदी खाक

माझगावमधील जीएसटी भवनला आग; जीवितहानी नाही, फाइल्स, नोंदी खाक

Next

मुंबई : माझगावच्या जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्यावर सोमवारी दुपारी आग लागून वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, फर्निचर, फाइल्स, नोंदी इत्यादी जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच इमारत रिकामी करण्यात आल्याने हजारो कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. आग लागली, तेव्हा आत हजारो कर्मचारी होते.

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाची १६ फायर इंजिन व रुग्णवाहिका दाखल झाल्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास किरकोळ दिसणारी आग नंतर वेगाने पसरली. यामुळे नववा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. इमारत धुराने काळवंडली.
नवव्या मजल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यासाठीचे बांबूचे साहित्यही जळून खाली कोसळले. समुद्रावरून वेगाने वारे वाहत असल्याने आग भडकत होती. दुपारी दोनच्या सुमारास ती विझविण्यात यश आले, असे वाटत असतानाच ती पुन्हा भडकली. खबरदारीचा उपाय म्हणून लगतचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला. परिसरातील वाहतूकही वळविण्यात आली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी करू नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शर्थीच्या प्रयत्नांअंती साडेतीन वाजता अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.
नवव्या व दहाव्या मजल्यावर लाकडी केबिन असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली, असे निरीक्षण अग्निशमन अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.

अजित पवारांनी केली पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून, प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले. त्यांनी पोलीस, अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून सुरू असलेल्या मदत व बचावकार्याचा आढावा घेतला.

Web Title: Fire at GST building in Mazgaon; No casualties, files, records entries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.