मुंबईतील दादरच्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये आग; १६ वाहने जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 10:44 IST2023-11-07T10:43:36+5:302023-11-07T10:44:59+5:30
तब्बल एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

मुंबईतील दादरच्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये आग; १६ वाहने जळून खाक
Mumbai Fire Updates: मुंबईतील अतिशय प्रसिद्ध अशा दादरच्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मुंबई महापालिकेच्या पार्किंग लॉटमध्ये मोठी आग लागली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीत १६ ते १७ गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या १० ते १२ बंबांच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन करुन अतिरिक्त वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळेच ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आग कशामुळे लागली, याचा तपास केला जात आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेली कोहिनूर स्क्वेअर इमारत गजबजलेले ठिकाण आहे. दादर पश्चिम विभागात शिवसेना भवन समोरच असलेल्या कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री मोठी आग लागली. एक वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आणि चौथ्या मजल्यावर ही मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तब्बल एक तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. सध्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये फायर कुलिंगचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.