मुंबईत गेल्या वर्षभरात आगीच्या घटनांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:22 AM2020-01-02T01:22:58+5:302020-01-02T01:23:04+5:30
९७ आगी गंभीर स्वरूपाच्या; तीन वर्षांच्या तुलनेत २०१९मध्ये सर्वाधिक घटना
मुंबई : अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना चाप लावण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने उपाहारगृह, हॉटेल्स, मॉल्स यांची झाडाझडती घेतली. आगीच्या दुर्घटनेवेळी मदत पोहोचण्यापूर्वी स्वत:चा बचाव कसा करावा? याचेही मुंबईकरांना धडे देण्यात येत आहेत. परंतु, या सर्व प्रयत्नांनंतरही मुंबई आगीपासून सुरक्षित नसल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये २०१९ मध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ५,४२७ ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. यापैकी ९७ आगी गंभीर स्वरूपाच्या होत्या.
दोन वर्षांपूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कम्पाउंडमध्ये रेस्टो पबला आग लागून १४ लोकांचा मृत्यू झाला होता. मुंबईतील उपाहारगृह, मॉल्स, व्यापारी संकुलांत अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून आगीशी खेळ सुरू असल्याचे या दुर्घटनेतून समोर आले. त्यामुळे पालिकेने सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स, मॉल्स, इमारती, व्यापारी संकुलांत झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. मात्र दोन वर्षांनंतर मुंबईतील परिस्थिती जैसे थे आहे.
गेल्या आठवड्यात साकीनाका येथील खैराणी रोडवर रासायनिक गोदामात आग लागली. ही गेल्या वर्षाच्या अखेरीस मुंबईत लागलेली सर्वांत मोठी आग ठरली. लोकवस्तीमधील रासायनिक कारखाने म्हणजे आगीला आमंत्रण असल्याचेही या घटनेमुळे समोर आले. त्यामुळे मुंबईतील अशा कारखान्यांचा शोध सुरू असून उपाहारगृहे व हॉटेलमधील झाडाझडतीने पुन्हा वेग घेतला आहे.
आॅर्केस्ट्रा, डिस्को थेकवर करवाई
२१ ते ३१ डिसेंबरदरम्यान ४०२ आॅर्केस्ट्रा, डिस्को थेकची तपासणी करण्यात आली. यापैकी १७३ ठिकाणी अग्निशमन दलाने सूचना केल्यानंतर आवश्यक बदल करण्यात आले. तर ११५ ठिकाणी दखल घेण्यात आली नाही.
वर्ष आगीच्या घटना
२०१६-२०१७ ४,९०७
२०१७-२०१८ ४,८०५
२०१८-२०१९ ५,४२७
एकूण १५,१३९