मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जखमी झाले आहेत. गुरुवारी ( 28 डिसेंबर ) इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस बिस्ट्रो पबमध्ये भीषण असं अग्नितांडव घडलं.
या अग्नितांडवात मृत पावलेल्यांमध्ये खुशबू मेहता या 28 वर्षीय विवाहितेचा समावेश आहे. खुशबू आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी पबमध्ये आली होती. मात्र, खुशबूचा हा वाढदिवस अखेरचा ठरणार आहे, याची साधी कल्पनादेखील कुणी केली नव्हती. खुशबूच्या जाण्यानं मेहता कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खुशबू मेहताचे कुटुंबीय
कमला मिल कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीत गुरुवारी रात्री उशिरा भीषण अग्नितांडव घडलं. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 11 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल'ला ही भीषण आग लागली. याप्रकरणी पब आणि रेस्टॉरन्टच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही आग एवढी भीषण होती की, मोजोच्या खाली असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
दुर्घटनेत गुदरमरल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे डॉक्टर राजेश डेरे यांनी दिली आहे. डॉ. डेरे यांनी या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन केले. आगीपासून वाचवण्यासाठी स्वत:ला कोंडून घेतल्याने नाका, तोंडात धुर जाऊन गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी दिली. 10 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. केईएम रुग्णालयातील सर्व जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केईएमचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. मोजोस हे रेस्टॉरंट पूर्णतः शाकाहारी असून, या रेस्टॉरंटमध्ये गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोकांची गर्दी असते. मोजोच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते. यामुळे आगीनं अधिकच रौद्र रुप धारण केले.
मृतांची नावंप्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली जोशी, पारुल, खुशबू मेहता, मनीषा शहा, प्राची शहा, प्राची खेतान, यश ठक्कर, सरबजित परेडा, धैर्य ललानी, विश्व ललानी