दहिसर येथील कोविड सेंटरमध्ये आग; रुग्ण स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:32+5:302021-04-05T04:06:32+5:30
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भांडूप येथील ड्रिम्स मॉलमधील सनराईज या रुग्णालयास आग लागून नऊजणांचा ...
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भांडूप येथील ड्रिम्स मॉलमधील सनराईज या रुग्णालयास आग लागून नऊजणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दहिसर येथील जम्बो कोविड सेंटर येथे हँगर एफमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यंत्रणांनी वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविल्याने हानी टळली. येथील आग शमविण्याचे काम सुरू असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून आग लागलेल्या हँगरमधील रुग्ण ताबडतोब सी हँगरमध्ये स्थलांतरित करण्यात आले.
मुंबई अग्निशमन दलाकडून प्राप्त माहितीनुसार, दुपारी बारा वाजता दहिसर जम्बो कोविड सेंटर येथे हँगर एफ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. जी हँगरमध्ये आग पसरली. एफ हँगर मध्ये ५० रुग्ण होते. जी हँगर मध्ये ४९ रुग्ण होते. एफ हँगर मध्ये आग लागल्याने तेथील वार्डबॉयला प्रथम समजले. आगीची माहिती मिळताच दहिसर जम्बो कोविड सेंटर येथे उपस्थित असलेले फायर फायटर्सच्या मदतीने मनपाचे सुरक्षारक्षक लक्ष्मण लांडगे व ईगल सेक्युरिटीचे रवींद्र मतो व इतर ईगल सुरक्षारक्षक यांनी आग साधारणत: अर्ध्या तासात विझविली.
आग विझवीत असताना आग लागलेल्या हँगरमधील रुग्ण ताबडतोब सी हँगरमध्ये स्थलांतरित करण्यात आले. शिवाय वीज पुरवठासुद्धा खंडित करण्यात आला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच कांदरपाडा फायर ब्रिगेडचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.